World Most Expensive Fish: जपानमधील एका मासळी लिलावाने यंदा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. टोकियो शहरातील प्रसिद्ध मासळी बाजारात झालेल्या नववर्षाच्या पहिल्या लिलावात एक प्रचंड ब्लूफिन टूना मासळी तब्बल 3.2 मिलियन डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 29 कोटी रुपयांना विकली गेली. विशेष म्हणजे, या एकाच मासळीने आतापर्यंतचे सर्व किंमतींचे विक्रम मोडीत काढले आहेत.
ही महागडी ब्लूफिन टूना जपानमधील सुप्रसिद्ध सुशी उद्योजक कियोशी किमुरा यांच्या रेस्टॉरंट साखळीने खरेदी केली आहे. स्वतःला ‘टूना किंग’ म्हणवणारे किमुरा हे टोकियोतील नामांकित सुशी ब्रँडचे मालक असून, दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या लिलावात ते मोठी बोली लावण्यासाठी ओळखले जातात. यंदा त्यांनी 243 किलोग्राम वजनाच्या या ब्लूफिन टूनासाठी विक्रमी रक्कम मोजली.
ही मासळी जपानच्या उत्तरेकडील समुद्र किनाऱ्याजवळ पकडण्यात आली होती. आकाराने मोठी, वजनदार आणि दर्जेदार असल्यामुळे या टूनाची मागणी प्रचंड होती. टोकियोच्या मासळी बाजारात दरवर्षी 1 जानेवारी रोजी होणारी पहिली लिलाव प्रक्रिया जपानमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या लिलावात खरेदी केलेली मासळी व्यवसायासाठी शुभ मानली जाते, त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींच्या बोली लावल्या जातात.
या लिलावातील किंमत केवळ व्यावसायिक नव्हे, तर पर्यावरणीय दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात ब्लूफिन टूना माशांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत घट झाली होती. मात्र आता या मासळीच्या साठ्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे संकेत या लिलावातून मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वीचा विक्रम पाहिला तर 2019 साली 278 किलोग्राम वजनाची ब्लूफिन टूना सुमारे 19 कोटी रुपयांना विकली गेली होती. तर मागील वर्षी 276 किलोग्राम वजनाच्या मासळीला सुमारे 12 कोटींची बोली लागली होती. मात्र यंदाच्या लिलावात 29 कोटींचा आकडा गाठत नवा इतिहास रचण्यात आला आहे.
ब्लूफिन टूना इतकी महाग का असते, हा प्रश्न अनेकांना पडतो. ही मासळी सुशी आणि साशिमी बनवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. तिचं मांस अत्यंत मऊ, चविष्ट आणि दर्जेदार असतं. शिवाय ही मासळी दुर्मिळ असून वेगवान आणि लांब अंतर पोहणारी असल्यामुळे तिचं महत्त्व अधिक वाढतं. त्यामुळे जपानसारख्या देशात ब्लूफिन टूना ही केवळ मासळी नसून प्रतिष्ठा, परंपरा आणि व्यवसायाचा भाग बनली आहे.