Nepal flood Rescue: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापूर आणि भूस्खलनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 320 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. दुसरीकडे, चीनच्या सीमेवर अडकलेले 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या सुरक्षित पुनरागमनासाठी चर्चा सुरू आहे. या भीषण संकटाच्या काळात भारताने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करत नेपाळला मोठा दिलासा दिला आहे.
त्रिशूली 3A प्रकल्पाच्या बोगद्यात बिकट परिस्थिती
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील त्रिशूली 3A हायड्रोपावर प्रोजेक्टच्या बोगद्यात 100 हून अधिक स्थानिक आणि भारतीय मजूर अडकले आहेत. महापुरामुळे आलेल्या मलब्याने बोगद्याचे प्रवेशद्वार बंद झाल्याने तिथे पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे. नेपाळी लष्कराने बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. सुरुवातीला नेपाळने भारत, चीन आणि अमेरिकेच्या बचाव पथकांची मदत नाकारली होती, कारण 2015 च्या भूकंपात विदेशी पथकांशी समन्वय साधणे कठीण गेले होते. परंतु बोगद्यातील गुंतागुंतीचे आव्हान लक्षात घेता नेपाळने अखेर भारताकडे विशेष तज्ज्ञांची मागणी केली.
उत्तराखंडच्या सिलक्यारा दुर्घटनेतील तज्ज्ञ मैदानात
बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी भारताने आपले प्रसिद्ध रॅट होल मायनर्स मैदानात उतरवले आहेत. याच तज्ज्ञांनी 2023 मध्ये उत्तराखंड येथील सिलक्यारा बोगदा दुर्घटनेत 17 दिवस अडकलेल्या 41 मजुरांना सुरक्षित बाहेर काढले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पथक घटनास्थळाची पाहणी करून योग्य रणनीती आखेल.
हेही वाचा – Nepal Floods : महापुराचे भीषण वास्तव! शवागरे पडताहेत अपुरी; रिकाम्या इमारती अन् 'ड्राय आईस'चा आधार
काय आहे रॅट होल मायनिंग पद्धत?
– रॅट होल मायनिंग म्हणजे उंदराच्या बिळाप्रमाणे तयार केलेल्या अत्यंत अरुंद मार्गातून काम करणे
– जिथे मोठ्या आधुनिक मशिन्स अयशस्वी ठरतात, तिथे या पारंपारिक पद्धतीचा वापर केला जातो
– अरुंद जागेत घुसून कुदळ, फावडे आणि बादलीच्या साहाय्याने हाताने माती व दगड बाजूला केले जातात
– सिलक्यारा दुर्घटनेत मेटल पाईपमधून सरपटत जात मजुरांपर्यंत मार्ग तयार करण्यात आला होता. हाच अनुभव आता नेपाळमध्ये वापरला जाणार आहे
– भारताकडून मदत साहित्याची तिसरी खेप काठमांडूत
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, विशेष विमानाद्वारे 10 टन तातडीचे मदत साहित्य नेपाळला पाठवण्यात आले आहे. यासोबतच 11 सदस्यांचे विशेष वैद्यकीय पथक आणि टनेल रेस्क्यू टीम काठमांडूमध्ये दाखल झाली आहे. संकट कितीही मोठे असले तरी शेजारील मित्राच्या मदतीला भारत नेहमीच तत्पर असतो, हे या मोहिमेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.