राज्यात कोरोना रुग्णांच्यासंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिक अद्यापही बेफिकीर आहेत. बेजबाबदार नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. अनेक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. अमरावतीत मास्क न वापरणाऱ्यांवर महानगरपालिकेची धडक मोहिम सुरू केली आहे.
अमरावतीमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत अमरावतीमध्ये लाख रुपयांपेक्षा अधिक दंड पालिकेकडून वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्यामुळे आता अमरावतीकरांची खैर नसल्याचे चित्र दिसत आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सहा पथक कारावाईसाठी तैनात केले आहेत.
अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज अमरावतीमध्ये ८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात एकूण ३०५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.