IAS Tukaram Mundhe Biopic: महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून ‘फायरब्रँड’ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवायांचा धडाका सुरू केला आहे. भेसळयुक्त दूध, अस्वच्छ रेस्टॉरंट्स, प्रतिबंधित गुटखा आणि नियम न पाळणाऱ्या फूड डिलिव्हरी अॅप्सवर त्यांनी कडक पावले उचलली आहेत. या धडक मोहिमांमुळे मुंढे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले असून, त्यांच्या याच संघर्षमय कारकिर्दीवर आधारित चित्रपट तयार केला जात असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
अक्षय कुमार साकारणार मुख्य भूमिका? व्हायरल पोस्टचा सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आजवर अनेक सत्य घटना आणि बायोपिक्सवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘पॅडमॅन’, ‘मिशन रानीगंज’, ‘केसरी: चाप्टर 2’, ‘गोल्ड’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘रुस्तम’ यांसारख्या कलाकृतींमध्ये त्याने काम केले आहे. यामुळेच तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्येही अक्षय कुमार त्यांची भूमिका साकारणार असल्याचे दावे काही व्हायरल पोस्ट्सद्वारे केले जात आहेत. आयएएस मुंढेंचे आयुष्य, त्यांचे धडक निर्णय, बदल्यांचे सत्र आणि संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नागरिक उत्सुक असल्याने या बातम्या वेगाने पसरल्या.
निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा नाही
व्हायरल होणाऱ्या या बातम्यांमध्ये कोणताही अधिकृत आधार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अक्षय कुमार किंवा कोणत्याही बड्या चित्रपट निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी अशा प्रकारच्या बायोपिकची घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे अक्षय कुमारचे फोटो आणि पोस्ट्स हे केवळ नेटिझन्सनी एडिट करून तयार केलेले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर चित्रपट येत असल्याचा दावा सध्यातरी पूर्णपणे अफवाच ठरला आहे.
प्रामाणिक कारकीर्द अन् तरुण वर्गात ‘रिअल लाईफ हिरो’ची प्रतिमा
तुकाराम मुंढे हे प्रशासकीय वर्तुळात एक अत्यंत कडक, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. कारकिर्दीत अनेकदा बदल्यांचा सामना करावा लागूनही त्यांनी दबावापुढे न झुकता आपले काम चोख बजावले आहे. आजच्या तरुणाईमध्ये त्यांच्या या बाणेदार वृत्तीमुळे ते ‘रिअल लाईफ हिरो’ ठरले आहेत. त्यामुळे भविष्यात कधी त्यांच्या आयुष्यावर खरोखरच बायोपिकची अधिकृत घोषणा झाली, तर त्यात नवल वाटायला नको, अशी भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.