Poonch Landslide Tragedy: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले आहे. पुंछ जिल्ह्यातील लोराण या डोंगराळ गावात दरड कोसळून एक मातीचे घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. नागरी प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. पुंछ जिल्ह्यात शनिवार संध्याकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण 17 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत.
बटोत-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावरही दुर्घटना
पावसाचा तडाखा केवळ पुंछपुरता मर्यादित नसून बटोत-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावरही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. डोंगरावरून कोसळलेले मोठे दगड रस्त्यावरून जाणाऱ्या बसवर आदळल्याने 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक मुख्य रस्ते बंद पडले आहेत; तर सखल भागात पुराचे पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून तात्काळ राज्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Heartbreaking and deeply unfortunate news is coming from the Loran area of Poonch, Jammu & Kashmir, where a devastating landslide struck a residential house, trapping a family inside. Tragically, six to Seven people are feared to have lost their lives in this horrific incident. pic.twitter.com/NNZoHaD22q — Ravinder Raina (@RavinderRaina) July 20, 2026
नेत्यांकडून दुःख व्यक्त; सतर्कतेचे आवाहन
या वेदनादायी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी ‘X’ वर पोस्ट करत लोराणमधील घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यंत तातडीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन केले आहे.