IIT Glacial Lakes Study: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी आपत्तीला आठवडा उलटला असला तरी, अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरूच आहे. हिमनदी-सरोवर फुटल्यामुळे (GLOF) ओढवलेल्या या भीषण आपत्तीत 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4,000 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर आयआयटी (IIT) मंडीच्या अभ्यासातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. सुमारे 200 हिमनदी-सरोवरांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, त्यापैकी 9 ते 12 सरोवरे 'अति-धोकादायक' श्रेणीत आहेत. गेल्या दशकात हिमाचल प्रदेशातील अनेक हिमनदी-सरोवरांचा आकार 30 ते 60 टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर जलप्रलय आणि विनाशाचा धोका निर्माण झाला आहे.
पर्यटन, प्रदूषण आणि 'परमाफ्रॉस्ट' वितळल्यामुळे हिमनद्यांवर संकट
IIT मंडी येथील 'स्कूल ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग'चे सहयोगी प्राध्यापक डेरिक पी. शुक्ला यांनी स्पष्ट केले की, हिमालयीन क्षेत्रातील वाढते पर्यटन आणि प्रदूषणामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. वाहनांच्या ये-जा आणि मानवी हालचालींमुळे निर्माण झालेला कार्बन आणि धूळ बर्फाच्या पृष्ठभागावर साचून गडद थर तयार करतात, ज्यामुळे सूर्यप्रकाश अधिक शोषला जाऊन बर्फ वेगाने वितळतो. याव्यतिरिक्त, हिमालयीन भागातील 'परमाफ्रॉस्ट' (कायमस्वरूपी गोठलेली जमीन) वितळल्यामुळे जमीन अस्थिर होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. 26 ऑगस्ट रोजी नेपाळमधील 'ल्हेन्डे खोला' आणि 'भोटे कोशी' नदीत आलेला विनाशकारी पूर हा याच घटकांचा परिणाम होता.
हेही वाचा – Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! एकाच घरात सापडले तब्बल 23 मृतदेह; आईच्या कुशीत लेकीने सोडले प्राण
NDMA कडून 4 तर IIT मंडीकडून 9 ते 12 संवेदनशील सरोवरांची ओळख
'नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी'ने (NDMA) हिमाचल प्रदेशातील 4 अत्यंत धोकादायक सरोवरांची ओळख पटवली आहे; ज्यामध्ये घेपान, वासुकी, काशांग आणि बास्पाजवळील सरोवराचा समावेश आहे. तर IIT मंडीच्या संशोधनानुसार 9 ते 12 सरोवरे अत्यंत चिंताजनक स्थितीत आहेत. यात विशेषतः घेपान सरोवर, योचे आणि काली कुंड या सरोवरांचा आकार दरवर्षी वाढत असल्याने मानवी वस्तीला सर्वाधिक धोका आहे. बोगदे आणि रस्त्यांच्या अनिर्बंध विकासकामांमुळे वर्षभर सुरू राहणाऱ्या पर्यटनावर नियंत्रण ठेवणे आणि या हिमनदी-सरोवरांकडे तातडीने लक्ष देणे प्रशासनासाठी गरजेचे बनले आहे.