Nepal Flood High Alert to Bihar: नेपाळमधील महापुराचा बिहारला मोठा फटका; गंडक नदीचं रौद्ररूप, 6 जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’

गंडक नदीतील पाण्याचा वाढता दाब लक्षात घेता पश्चिम चंपारण (बेतिया), पूर्व चंपारण (मोतिहारी), गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Nepal Flood High Alert to Bihar: नेपाळमधील महापुराचा बिहारला मोठा फटका; गंडक नदीचं रौद्ररूप, 6 जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’

High Alert to Bihar amid Nepal Flood Situation: नेपाळमधील डोंगराळ भागात आणि वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमधून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भारतातील बिहार राज्यावर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे. तिबेटमधून उगम पावणाऱ्या भोटेकोशी नदीची पातळी अवघ्या काही तासांत 3 मीटरने वाढल्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महापुराचा भीषण धोका निर्माण झाला आहे. गंडक नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदीत 3 मीटरपर्यंत उच्च लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संभाव्य महाप्रलयाची गांभीर्याने दखल घेत सीमावर्ती भागात युद्धपातळीवर आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.  

मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्याकडून तातडीचा आढावा; 6 जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता
परिस्थिती हाताळण्यासाठी बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) सहभागी झाले होते. गंडक नदीतील पाण्याचा वाढता दाब लक्षात घेता पश्चिम चंपारण (बेतिया), पूर्व चंपारण (मोतिहारी), गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच सीतामढी आणि शिवहर येथील प्रशासनालाही 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

वाल्मिकीनगर येथील गंडक बॅरेजचे सर्व 36 दरवाजे उघडले; अभियंते 24 तास तैनात
नदीचा पाण्याचा प्रचंड दाब नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीची पावले उचलली आहेत. वाल्मिकीनगर येथील गंडक बॅरेजचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले असून, त्याला जोडलेल्या उपकालव्यांमध्येही पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदीच्या पुरामुळे कमकुवत बंधारे फुटू नयेत किंवा धूप होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंते आणि कर्मचारी 24 तास घटनास्थळी नजर ठेवून आहेत.

पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ
तिबेटमध्ये सकाळी 9 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत सुमारे 3 मीटरची प्रचंड वाढ झाली आहे. ही नदी पुढे त्रिशुली नदी खोऱ्याला मिळते, जी थेट गंडक नदी प्रणालीचा मुख्य भाग आहे. नेपाळमधील भोटेकोशी नदीचे पाणी त्रिशूली नदीतून पुढे भारतातील गंडक आणि कोशी नद्यांमध्ये येत असल्याने बिहारमध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत गंडक नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग आणि पातळी कमालीची वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

NDRF, SDRF आणि SSB ची आपत्कालीन पथके तैनात; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) विशेष पथके बेतिया आणि गोपालगंज येथे पाठवण्यात आली असून मुझफ्फरपूरमध्ये एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. यासोबतच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) पथके आणि सशस्त्र सीमा बलाचे (SSB) जलद प्रतिसाद पथक (QRT) कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. प्रशासनाने नागरिकांना न घाबरता सतर्क राहण्याचे आणि सखल भागातून सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातही सतर्कता
नेपाळमधील या आपत्तीचा परिणाम केवळ बिहारवरच नव्हे, तर उत्तर प्रदेशवरही होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजगंज आणि कुशीनगर या सीमावर्ती जिल्ह्यांतील प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला असून, गंडक नदीच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मदत आणि तक्रारीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन
पाटणा येथील ‘सिंचन भवन’मधील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष २४ तास सक्रिय करण्यात आला आहे. नदीच्या पात्रातील गळती, धूप किंवा तटबंदीचे नुकसान झाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
टोल-फ्री क्रमांक:1800-345-6145
फोन क्रमांक:0612-2206669, 0612-2215850
मोबाईल क्रमांक:7463889706, 7463889707

सुरक्षा व्यवस्था आणि बंधाऱ्यांचे सातत्यपूर्ण निरीक्षण
संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील पूल, धोकादायक व कमकुवत बंधारे आणि नदीकाठच्या निवासी क्षेत्रांची पाहणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. पूरग्रस्त किंवा सखल भागात राहणाऱ्या लोकांना वेळेवर सतर्क करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number