Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याचा दावा केला. या धक्कादायक बातमीनंतर संपूर्ण पाकिस्तानात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पीटीआय पक्षाने तातडीने निवेदन जारी करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत पत्रकाराचा दावा
पत्रकार वजाहत सईद खान यांच्या अहवालात इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आल्यानंतर पीटीआय समर्थक आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी आधीपासूनच विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या, तसेच त्यांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते. अशातच या अहवालामुळे इम्रान यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता अधिक वाढली आहे. ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत पीटीआयच्या मध्यवर्ती प्रसारमाध्यम विभागाने स्पष्ट केले की, इम्रान खान यांच्याबाबत येणाऱ्या या धक्केदायक बातम्यांमुळे देशात गंभीर चिंता आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऑगस्ट 2023 पासून अदियाला तुरुंगात कैद
इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असून सध्या ते रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. याशिवाय, 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसाचार आणि निदर्शनांशी संबंधित दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या अनेक खटल्यांनाही ते सामोरे जात आहेत. प्रदीर्घ काळापासून तुरुंगात असलेल्या इम्रान यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने संशय बळावला आहे.
जनतेच्या भावनेचा आदर करत पारदर्शकतेची मागणी
पीटीआयने आपल्या निवेदनात सरकारला इशारा देत म्हटले आहे की, इम्रान खान हे केवळ एक साधे राजकीय कार्यकर्ते नसून लाखो पाकिस्तानी जनतेचे लोकप्रिय आणि निवडून दिलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची खरी माहिती देशासमोर आणणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाच्या सुरक्षेचा प्रश्न थेट लाखो नागरिकांच्या भावनांशी जोडलेला आहे. प्रकृतीबाबतची ही अनिश्चितता यापुढे सहन केली जाणार नाही आणि ती पूर्णपणे ‘अस्वीकार्य’ आहे, असे पक्षाने ठणकावून सांगितले.
BIG: Senior Pakistani Journalist Wajahat S Khan claims that his sources who are three Senior Officers in Pakistani Army have said that they fear Former Pakistan PM Imran Khan is dead inside prison and hence Pakistan Army Chief Asim Munir is hiding him from the entire country. pic.twitter.com/IDjeqFEh1s — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2026
तातडीने वैद्यकीय तपासणीची मागणी
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पीटीआयने मागणी केली आहे की, सरकारने इम्रान खान यांना त्यांचे कुटुंबीय, वैयक्तिक डॉक्टर, वकील आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची परवानगी तातडीने द्यावी. तसेच, त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली, कुटुंबाच्या उपस्थितीत आणि पूर्ण पारदर्शकतेने त्यांची सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी आणि उपचार केले जावेत, असा पुनरुच्चार पक्षाने केला आहे.