Karachi HIV Outbreak: पाकिस्तानातील कराची शहरातून एक मन हेलावून टाकणारी आणि भीषण वैद्यकीय निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. तिथल्या औद्योगिक क्षेत्रातील कुलसूम बाई वालिका या वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या तब्बल 94 चिमुकल्यांना एचआयव्ही (HIV) या जीवघेण्या आजाराची लागण झाली आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या संसर्गामुळे आतापर्यंत 6 निष्पाप बालकांनी आपला जीव गमावला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिंध एम्प्लॉईज सोशल सिक्युरिटी इन्स्टिट्यूशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या या रुग्णालयात बालकांवर उपचार करताना दूषित किंवा वापरलेल्या सिरिंजचा पुन्हा वापर करण्यात आला, ज्यामुळे हा संसर्ग वेगाने पसरला.
परिसरातील इतर नागरिकही बाधित; बाधितांचा आकडा वाढण्याची भीती
हा धक्कादायक प्रकार सर्वात आधी नोव्हेंबर 2025 मध्ये निदर्शनास आला होता. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आसपासच्या निवासी भागामध्ये आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये आणखी 120 नागरिक बाधित आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सिंध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील तारिक मन्सूर यांच्या दाव्यानुसार, बाधित बालकांची खरी संख्या 200 च्या आसपास असण्याची दाट शक्यता आहे.
सिंध उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे आणि चौकशीचे आदेश
या गंभीर प्रकरणाची दखल घेत सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रांतीय मुख्य सचिवांमार्फत एका स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी समितीच्या स्थापनेचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत सादर केलेले अहवाल अपुरे असल्याचे सांगत न्यायालयाने प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर वैयक्तिक गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पीडित कुटुंबांना भरपाई व मोफत उपचारांचे निर्देश
अदालत प्रशासनाने बाधित बालकांच्या भविष्याचा विचार करून राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सर्व संक्रमित बालकांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय उपचार, नियमित आरोग्य तपासण्या, आवश्यक औषधे आणि योग्य समुपदेशन सेवा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, ज्या कुटुंबांनी आपल्या चिमुकल्यांना गमावले आहे आणि ज्यांची मुले या संसर्गाशी लढत आहेत, त्या पीडित कुटुंबांना राज्य शासनाकडून तातडीने योग्य ती आर्थिक मदत व भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने जारी केले आहेत.