Gate 2027 Registration: इंजिनिअरिंग क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात गेट 2027 (GATE 2027) या परीक्षेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आज, 27 ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. एम.ई. (ME), एम.टेक. (MTech) आणि थेट पीएचडी (PhD) यांसारख्या उच्च अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
GATE 2027 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना GOAPS (GATE Online Application Processing System) या अधिकृत पोर्टलला भेट देऊन अर्ज भरावा लागेल. नोंदणी प्रक्रियेसाठी वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. अर्जात स्वतःची माहिती भरताना ती अधिकृत दाखल्यांनुसारच अचूक भरावी. अर्ज करताना उमेदवारांकडे खालील कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे:
– वैध फोटो ओळखपत्र (जसे की पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र)
– पासपोर्ट साईजचा ताजा फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी
– पदवी प्रमाणपत्र, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा अंतिम वर्षाची मार्कशीट
– लागू असल्यास जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला किंवा दिव्यांगत्व (PwD) प्रमाणपत्र
परीक्षेचे वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा
या परीक्षेचे नियोजन आणि अर्ज सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
– ऑनलाइन नोंदणीची सुरुवात: 27 ऑगस्ट
– नियमित शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर
– विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत: 5 ऑक्टोबर
– अर्जात दुरुस्ती (Correction Window) करण्याची मुदत: 14 ते 21 ऑक्टोबर
– GATE 2027 परीक्षेचे आयोजन: 6, 7, 13, 14, 20 आणि 21 फेब्रुवारी
अर्ज शुल्क आणि इतर सूचना
नियमित कालावधीत अर्ज करताना महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांसाठी प्रति पेपर 1,000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रति पेपर 2,000 रुपये शुल्क लागू राहील. निर्धारित मुदतीनंतर विलंब शुल्कासह अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मूळ शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 500 रुपये भरावे लागतील. सर्व उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करताना अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य आकार आणि स्वरूपाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
हेही वाचा – Shikshak Bharti 2026: D.Ed., B.Ed. पदवीधारकांसाठी मोठी बातमी; राज्यात 2421 शिक्षकांची होणार महाभरती