Ganga Aarti Thames River London: लंडनमध्ये रविवारी एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. भारतातील वाराणसीच्या गंगेच्या घाटांवर ज्या प्रकारे विलोभनीय आरती केली जाते, अगदी तसाच सोहळा लंडनमधील प्रसिद्ध थेम्स नदीच्या काठावर रंगला होता. ‘गंगा आरती ऑन द थेम्स: अ सेलिब्रेशन ऑफ लाईट’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच भव्य गंगा आरतीने संपूर्ण लंडन शहराला भारतीय संस्कृतीच्या आणि भक्तीच्या रंगात रंगवून टाकले. या दिव्य सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, लंडनमधील या दृश्याने सर्व देश-विदेशातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘चिन्मय मिशन यूके’च्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष आयोजन
‘चिन्मय मिशन यूके’ आणि ‘टोटली थेम्स फेस्टिव्हल’ यांच्या संयुक्त विद्यमाने या अभूतपूर्व कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. ‘चिन्मय मिशन’ या संस्थेच्या स्थापनेला यशस्वीरीत्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक उपक्रम राबवले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून थेम्स नदीकाठी ही गंगा आरती आयोजित केली गेली. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक भारतीयांसह शेकडो परदेशी नागरिकांनी आणि भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
गंगा आरती म्हणजे निसर्ग व जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी
या उपक्रमाबाबत माहिती देताना चिन्मय मिशन यूकेच्या निवासी शिक्षिका श्रीप्रिया चैतन्य यांनी सांगितले की, पिढ्यानपिढ्या लोक गंगेच्या काठावर एकत्र येऊन निसर्ग, पाणी आणि जीवन देणाऱ्या सर्व घटकांप्रत्यक्ष कृतज्ञता व्यक्त करतात. थेम्स नदीवर झालेल्या आरतीमागेही हीच एकता आणि आदरभावना होती. हिंदू परंपरेमध्ये आरती हा संगीत, मंत्रोच्चार आणि मोठ्या दिव्यांच्या साहाय्याने प्रार्थना करण्याचा विधी आहे. चिन्मय मिशनसाठी गंगा नदी ही केवळ एक पवित्र नदी नसून ती अखंड ज्ञानाच्या प्रवाहाचेही प्रतीक मानली जाते.
VIDEO | London: Ganga Aarti held on the Thames river for the first time. (Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/07RAcK7hyV — Press Trust of India (@PTI_News) September 14, 2026
हेही वाचा – Ganesh Chaturthi 2026: गणपतीला ‘प्रथम पूज्य’ का म्हणतात? यामागचे खरे कारण काय?
पर्यावरणपूरक आयोजन; थेम्स नदीत कोणत्याही वस्तूचे विसर्जन नाही
थेम्स नदीच्या काठावर पार पडलेल्या या पारंपरिक सोहळ्यात पर्यावरणाची आणि स्थानिक नियमांची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. चिन्मय मिशन यूकेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व विधी पूर्णपणे नदीच्या किनाऱ्यावर म्हणजेच जमिनीवर पार पडला. आरतीसाठी वापरण्यात आलेले कोणतेही दिवे किंवा इतर पूजेचे साहित्य नदीच्या पात्रात सोडण्यात आले नाही. परंपरेचा मान राखत आणि थेम्स नदीची स्वच्छता व नैसर्गिक स्थिती अबाधित ठेवत दिवे किनाऱ्यावरच ठेवण्यात आले होते.
परदेशात भारतीय संस्कृतीचा डंका; व्हिडिओला नेटकऱ्यांची मोठी पसंती
लंडनच्या मध्यभागी पार पडलेल्या या गंगा आरतीमुळे थेम्स नदीच्या पात्राला काही काळासाठी वाराणसीच्या पावन घाटांचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या कार्यक्रमाने परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मुळांशी जोडण्याचे काम केले आहे. पारंपरिक पोशाखात आलेल्या शेकडो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने केलेल्या मंत्रोच्चारामुळे आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे लंडनचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते.