Ethanol Blending 20 Percent Petrol Egg Price Hike: देशात वाढत्या महागाईच्या काळात आता खाद्यपदार्थांवर नव्या घटकांचा परिणाम दिसू लागला आहे. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या शासकीय धोरणामुळे केवळ साखरेच्या दरावरच नाही, तर आता अंड्यांच्या किमतींवरही तीव्र परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमती तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पूर्वी 6 ते 7 रुपयांना मिळणारे एक अंडे आता किरकोळ बाजारात 8 ते 9 रुपयांपर्यंत विकले जात आहे. काही ठिकाणी एका अंड्यासाठी 10 रुपयेही मोजावे लागत आहेत.
इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर अन् किमतीतील मोठी उडी
नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटीच्या (NECC) माहितीनुसार, भारतातील एकूण मका उत्पादनापैकी तब्बल 37 टक्के मका थेट इथेनॉल डिस्टिलरीजकडे पाठवला जात आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये कोंबड्यांच्या आहारासाठी मुख्यत्वे मक्याचा वापर केला जातो, परंतु याच मक्याचा मोठा साठा इथेनॉल निर्मितीसाठी वळवला जात असल्याने कोंबड्यांचे खाद्य प्रचंड महागले आहे.
देशात वार्षिक 43.4 दशलक्ष टन मक्याचे उत्पादन होते, ज्यातील जवळपास 17 दशलक्ष टन मका इथेनॉल बनवण्यासाठी वापरला जात आहे. या मागणीमुळे 3 वर्षांपूर्वी प्रतिटन 14,000 रुपये असलेला मका आता 26,500 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या केवळ 5 महिन्यांतच मक्याच्या दरात 20 टक्क्यांची वाढ झाली असून, पोल्ट्री उद्योगाच्या एकूण उत्पादनावरील खर्चात 65 ते 70 टक्के वाटा मक्याचाच असल्याने अंडी उत्पादकांचा खर्च दुप्पट झाला आहे.
हेही वाचा – RBI ची मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा
इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न अन् वाढणारा विरोध
भारत इंधनासाठी मुख्यत्वे अरबी देशांवर अवलंबून असून, परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगला प्रोत्साहन दिले आहे. ऊस आणि मक्यापासून हे बायोफ्युएल तयार केले जाते. मात्र, या धोरणामुळे अन्न सुरक्षा आणि वाहनांचे इंजिन या दोन्हीवर परिणाम होत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक वाहनधारकांच्या मते, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांची इंजिने खराब होत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधकांनी या धोरणाचा तीव्र निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासावर मोर्चेही काढण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आणि इंधन गरजांमधील वाढता संघर्ष
कच्च्या तेलाची आयात कमी करून आर्थिक बचत करण्याचा सरकारचा हेतू असला, तरी अन्नधान्याचा वापर इंधनासाठी केल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील खाद्यपदार्थ महाग होत आहेत. पोल्ट्री उद्योगाला देशातील 60 टक्के मक्याची गरज असते, परंतु इथेनॉल उद्योगाशी लागलेल्या स्पर्धेमुळे मक्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर मक्याचे उत्पादन वेगाने वाढवले गेले नाही, तर पुढील काळात अंडी आणि कोंबडीचे मांस आणखी महागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – LPG Cylinder Price Update: एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात; आजपासून नवे दर लागू, जाणून घ्या