Detergent Powder in Mid-day Meal: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील परसा मिडल स्कूलमध्ये मंगळवारी (18 ऑगस्ट) मध्यान्ह भोजनानंतर एक गंभीर घटना घडली. शाळेतील 34 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांनी भात आणि बटाटा-सोयाबीनची भाजी खाल्ल्यानंतर अचानक पोटदुखी, घशात जळजळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. काहींची प्रकृती बिघडून ते बेशुद्ध पडल्याने सर्व मुलांना तात्काळ बिहारशरीफ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नालंदाचे सिव्हिल सर्जन जय प्रकाश सिंग यांनी हे 'फूड पॉइझनिंग'चे प्रकरण असल्याचे सांगत सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे.
अन्नाला डिटर्जंटचा वास; मिठाऐवजी पावडर वाढल्याची स्वयंपाक्याची चूक?
रुग्णालयात उपचार घेत असलेली विद्यार्थिनी प्रीती कुमारी हिने अन्नातून डिटर्जंट पावडरचा तीव्र वास येत असल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कुमार सिंग यांच्या माहितीनुसार, एका एनजीओकडून (NGO) हे जेवण पुरवले जाते. जेवण वाढताना काही मुलांनी अतिरिक्त मीठ मागितले असता, तीन स्वयंपाक्यांपैकी एका महिला कर्मचाऱ्याने चुकीने मिठाऐवजी डिटर्जंट पावडर दिली. तथापि, नालंदाचे जिल्हा शिक्षण अधिकारी हेमचंद्र यांनी डिटर्जंट मिसळल्याचा दावा फेटाळला असून, वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यावरच खरं कारण समोर येईल असे म्हटले आहे.
पालकांचा आक्रोश आणि प्रशासनाची चौकशीची ग्वाही
आपल्या पाल्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेले पालक राजवीर कुमार यांनी सांगितले की, मुले सतत उलट्या करत खाली पडत असल्याचे दृश्य भयावह होते. शिक्षण विभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शाळांमधील अन्न सुरक्षेशी खेळणाऱ्या कोणत्याही निष्काळजीपणाला पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका स्थानिक प्रशासनाने घेतली आहे.
ग्रामीण विकास मंत्र्यांची रुग्णालयाला भेट; तपासणी आणि प्रशिक्षणाचे आदेश
घटनेची माहिती मिळताच नालंदाचे आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी रुग्णालयात जाऊन बाधित मुलांची विचारपूस केली. डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना देतानाच, त्यांनी पालकांना धीर दिला. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मध्यान्ह भोजनाच्या व्यवस्थेची अचानक तपासणी करण्याचे आणि स्वयंपाक्यांना स्वच्छता व सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.