Delhi Sleeper Bus Crime Case: दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) हादरवून सोडणाऱ्या एका घटनेत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांनाही अटक केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चालकाच्या आईने मीडियासमोर येत आपल्या मुलाची बाजू मांडल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
‘पतीच्या हत्येमागील लोकांचाच हा डाव’; आरोपीच्या आईचा गंभीर दावा
या प्रकरणात मुलाच्या अटकेनंतर कुलदीपच्या आईने आपली प्रतिक्रिया देत मुलगा पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ‘माझा मुलगा चुकीचे कृत्य करूच शकत नाही, त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवले जात आहे,’ असा दावा त्यांनी केला. दोन महिन्यांपूर्वीच आपल्या पतीची निर्घृण हत्या झाली होती आणि ज्या लोकांनी जमिनीच्या वादातून पतीचा जीव घेतला, त्याच शत्रूंनी माझ्या मुलाला या गुन्ह्यात फसवल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
सरकारकडे हात जोडून विनंती; पोलीस तपासाकडे लक्ष
आपले दुःख व्यक्त करताना आरोपीच्या आईने प्रशासनाला विनंती केली की, ‘माझी सरकारकडे हात जोडून एकच विनंती आहे, आमच्या मुलाने काहीही केलेले नाही, त्याची चौकशी करून त्याला निर्दोष सोडले पाहिजे.’ पतीने गमावल्यानंतर कुटुंब आधीच आर्थिक आणि मानसिक संकटात असल्याचे त्यांनी सांगितले. एका बाजूला पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कठोर कायदेशीर पावले उचलली आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या आईच्या या दाव्यानंतर पोलीस नक्की काय भूमिका घेतात आणि तपासात काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#WATCH | Kanpur (rural), Delhi | On alleged gang-rape of a minor girl on a sleeper bus, the mother of the arrested accused bus driver Kuldeep says, "… My child is completely innocent. He is being falsely implicated. My husband was murdered two months ago. I suspect the very… https://t.co/Y1NPll7jAQ pic.twitter.com/GeHPtVG1v3 — ANI (@ANI) August 31, 2026
पावसात रस्ता चुकलेल्या तरुणीवर ओढावला भयंकर प्रसंग
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असलेली 16 वर्षांची मुलगी 4 ऑगस्टच्या रात्री घरातून कोणालाही न सांगता नोएडा येथील चुलत भावाला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे रस्ता न कळल्याने ती ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. तेथून पुढे जाण्यासाठी तिने लिफ्ट मागितली असता चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी बस नोएडा सेक्टर 63 च्या दिशेने जात असल्याचे सांगून तिला विश्वासाने स्लीपर बसमध्ये बसवले. बस सुरू झाल्यावर दोघांनी तिच्याशी अश्लील चाळे करत आळीपाळीने अत्याचार केला आणि विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काश्मिरी गेट ISBT जवळील रिंग रोडवर तिला सोडून आरोपींनी तेथून पळ काढला, अशी घटना समोर आली होती.