Pune MHADA lottery 2026: पुणे शहर व परिसरात स्वतःचे हक्काचे घर घेण्याची इच्छा असलेल्या हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या 4,462 सदनिकांच्या सोडतीची मुदत प्रशासनाने वाढवली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना आणि कागदपत्रांची पडताळणी करताना नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक समस्या लक्षात घेऊन हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता या सर्व घरांची संगणकीय सोडत 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या या योजनेची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती, ती आता थेट एक महिन्याने म्हणजेच 15 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह PMRDA क्षेत्रात 4,462 सदनिका उपलब्ध
म्हाडाच्या या सोडतीमध्ये पुणे शहरातील 1,468 घरे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 1,406 घरे आणि पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील 1,588 घरांचा समावेश आहे. एकूण 4,462 घरांपैकी 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2,971 घरे, तर 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,491 घरे अर्जदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या 2 सोडतींमधील विकली न गेलेली 558 शिल्लक घरेदेखील या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
हेही वाचा – PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रुपये कधी जमा होणार? मोठी अपडेट समोर
सुधारित ऑनलाईन वेळापत्रक आणि उत्पन्नाच्या दाखल्याबाबत महत्त्वाचा नियम
म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) असेल. ऑनलाईन अनामत रक्कम 15 ऑक्टोबर रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत भरता येईल, तर आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत भरणा करता येणार आहे. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 12 नोव्हेंबरला, तर अंतिम यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता सोडत होऊन सायंकाळी 6 वाजता विजेत्यांची यादी जाहीर होईल. तसेच अर्जदारांना सोयीसाठी 2024-25 किंवा 2025-26 या आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा आयटीआर सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.