Correction if Wrong ITR Form is Selected: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करताना घाईगडबडीत अनेकदा करदात्यांकडून चुकीचा फॉर्म निवडला जातो. उदाहरणार्थ, 31 जुलैच्या मूळ मुदतीत अनेक पगारदार व्यक्ती ITR-1 किंवा ITR-2 भरतात. मात्र, त्यानंतर शेअर बाजारातील इंट्राडे ट्रेडिंग, F&O (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) मधील व्यवहार किंवा फ्रीलान्सिंगमधून मिळालेल्या उत्पन्नाची नोंद घेणे राहिल्याचे लक्षात येते. अशा व्यवसायातून उत्पन्न मिळणाऱ्या किंवा नॉन-ऑडिट करदात्यांसाठी ITR-3 किंवा ITR-4 हे फॉर्म लागू होतात, ज्यांची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. जर तुमच्याकडूनही असा फॉर्म चुकला असेल, तर घाबरण्याचे कारण नाही.
अचूकतेसाठी रिटर्नच्या स्थितीनुसार 'हे' दोन महत्त्वाचे मार्ग वापरा
तुमचा रिटर्न ई-व्हेरिफाय झाला आहे की नाही, यावर चूक सुधारण्याची पुढील प्रक्रिया अवलंबून असते:
आयटीआर ई-व्हेरिफाय केला नसेल तर (Discard Option): जर तुम्ही रिटर्न दाखल केला आहे; परंतु, अजून त्याचे ई-वेरिफिकेशन केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर ‘Discard’ (डिसकार्ड) या पर्यायाचा वापर करता येतो. यामुळे जुना अनव्हेरिफाइड रिटर्न पूर्णपणे हटवला जातो आणि योग्य ITR फॉर्म निवडून अगदी नव्याने मूळ रिटर्न भरता येतो.
आयटीआर ई-वेरिफाय झाला असेल तर (Revised Return): एकदा रिटर्न ई-व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा ओरिजिनल रिटर्न दाखल करता येत नाही. अशा वेळी आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत 'Revised Return' (सुधारित रिटर्न) दाखल करून चुकांची दुरुस्ती करता येते.
31 ऑगस्टच्या मुदतीपूर्वी दुरुस्ती करणे का आवश्यक आहे?
व्यवसाय किंवा ट्रेडिंगमध्ये झालेल्या नुकसानाची (F&O / Intrade Losses) पुढील वर्षांतील उत्पन्नाशी जुळवाजुळव (Set-off) करून ते कॅरी फॉरवर्ड करायचे असल्यास, विहित मुदतीत योग्य ITR फॉर्म भरणे अनिवार्य ठरते. याशिवाय, व्यावसायिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना जुन्या कर प्रणालीचा (Old Tax Regime) पर्याय निवडायचा असल्यास 31 ऑगस्टच्या मुदतीपूर्वी Form 10-IEA सादर करावा लागतो. मुदतीत चूक दुरुस्त केल्यास अतिरिक्त शुल्क, दंड (Late Fee under 234F) किंवा कलम 139(9) अंतर्गत डिफेक्टिव्ह रिटर्नची नोटीस येण्याचा धोका टळतो.
पुढील मुदती आणि करदात्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
नियम 139(5) अंतर्गत सुधारित रिटर्न (Revised Return) भरण्यासाठी असेसमेंट इयर संपण्यापूर्वी पुरेसा वेळ उपलब्ध असला, तरी जास्त विलंब केल्यास रिफंड मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या आयटीआरची स्टेटस तपासा. अनवेरिफाइड रिटर्न असल्यास Discard करा, तर ई-वेरिफाइड असल्यास तत्काळ Revised Return फाईल करा. फॉर्मच्या निवडीबाबत किंवा तांत्रिक बाबींबद्दल शंका असल्यास कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा (CA) सल्ला घेणे हिताचे ठरेल.