CJP protest Delhi: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसदेवर धडक देण्याच्या इशाऱ्यानंतर राजधानी दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातून आलेले हजारो आंदोलक संसदेच्या दिशेने पुढे सरकत असताना प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडक नाकेबंदी केली आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 163 लागू करण्यात आले असून, राजीव चौकासह प्रमुख 5 मेट्रो स्टेशनची प्रवेशद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. जमावाला रोखण्यासाठी तैनात असलेल्या मोठ्या पोलीस ताफ्याकडून लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. तरीही आंदोलक संसदेकडे जाण्यावर ठाम असल्याने संसदेचे सर्व मुख्य दरवाजे पूर्णपणे सील करण्यात आले आहेत.
10 मिनिटांच्या बैठकीत नड्डांना दिले मागण्यांचे पत्र; प्रवक्त्यांकडून नाराजी व्यक्त
रस्त्यावरील या तीव्र संघर्षानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर सौरभ दास यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितले की, तब्बल 2 महिने प्रतीक्षा केल्यानंतर सरकारकडून केवळ 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला. या बैठकीत शिष्टमंडळाने आंदोलकांच्या मागण्यांचे लिखित पत्र नड्डा यांच्याकडे सुपूर्द केले असून, त्यावर पक्षात चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.
हेही वाचा – Cjp protest: दिल्लीत तणाव शिगेला ! संसद भवनाचे दरवाजे बंद, पोलिसांकडून अश्रुधुरांचा वापर
'सीजेपी'च्या 3 प्रमुख मागण्या:
सोनम वांगचूक यांची तात्काळ सुटका: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी.
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा: 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
1 कोटी रुपयांची भरपाई: 'नीट' परीक्षेतील घोळामुळे आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.
आता या तिन्ही मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.