Chhindwara Hospital NICU Warmer Fire: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा रुग्णालयातील नवजात बाल संगोपन कक्षात (NICU) शनिवारी पहाटे 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास एक भयानक अपघात घडला. एनआयसीयूमध्ये ठेवलेल्या एका वॉर्मरच्या हिटिंग युनिटमधील फिलामेंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक ठिणगी पडली आणि आगीच्या ज्वाळा भडकल्या. या वॉर्मरमध्ये असलेल्या 3 नवजात बालकांना आगीची झळ बसल्याने ती गंभीररीत्या भाजली. या अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कर्मचाऱ्यांची तत्परता अन् 30 बालकांचे प्राण वाचवण्यात यश; जखमींवर जबलपूर येथे उपचार
आगीच्या ज्वाळा दिसताच तेथे तैनात असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत तातडीने वॉर्मरमधून बालकांना बाहेर काढले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी या अतिदक्षता विभागात एकूण 33 नवजात बालके दाखल होती. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे उर्वरित 30 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. आगीत होरपळलेल्या तिन्ही बालकांची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांनी पाहणी करून, त्यांना पुढील महत्त्वाच्या उपचारांसाठी विशेष रुग्णवाहिकेने डॉक्टरांच्या देखरेखीखाली जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले.
VIDEO | Madhya Pradesh: Three infants suffer burn injuries after fire breaks out in warmer machine at Chhindwara District Hospital NICU. The warmer machine caught fire in the Neonatal Intensive Care Unit (NICU) of Chhindwara District Hospital in Madhya Pradesh at 2 AM on Friday… pic.twitter.com/AIoj85k9iK — Press Trust of India (@PTI_News) August 22, 2026
‘पेडियाट्रिक सर्जन’चा अभाव; छिंदवाडाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या दुर्दैवी घटनेमुळे छिंदवाडा जिल्हा रुग्णालयातील गंभीर आरोग्य सुविधांची पोलखोल झाली आहे. रुग्णालयात बालकांसाठी विशेष ‘पीडियाट्रिक सर्जन’ उपलब्ध नसल्यामुळेच गंभीर भाजलेल्या बालकांना तातडीने दुसऱ्या शहरात हलवावे लागले. या घटनेनंतर इतर बालकांच्या घाबरलेल्या पालकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर तीव्र रोष व्यक्त केला असून, लहान मुलांच्या वॉर्डमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रुग्णालय प्रशासनाकडून निष्काळजीपणाचा दावा फेटाळला; सखोल चौकशीचे आदेश
दरम्यान, सिव्हिल सर्जन कांचन दुबे यांनी रुग्णालयाचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचे सांगत हा केवळ एक तांत्रिक अपघात असल्याचे म्हटले आहे. वॉर्मर आणि युनिटमधील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासणीसाठी तंत्रज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी स्वतः घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.