Kushal Badrike Post : शारदीय नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत सर्वजण वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करतात. नऊ दिवसांना नऊ रंगांचे महत्त्व आहे. त्यानुसार, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर या नऊ रंगांमधील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच, अभिनेता कुशल बद्रिकेनेही नवरात्री आणि रंगांवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कुशल बद्रिकेने रंग या शब्दावर अनेक प्रकारे कोट्या केल्या आहेत.
कुशलचे निरीक्षण, मजेशीर विचार आणि शाब्दिक कोट्या
‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे घराघरात पोहोचलेला कुशल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, “नऊ रंग आणि नवरात्रीचा विचार करत असताना, मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसे या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसेच रंग बदलणारा सरडासुद्धा असतो, पण त्यालाही नवरात्र साजरी करता येत नाही,” असं म्हणत व्हिडिओची सुरुवात केली.
हेही वाचा – Kantara Chapter 1 Trailer: ‘कांतारा चॅप्टर 1’ चा ट्रेलर रिलीज; पहा ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर
कुशल पुढे म्हणतो, “होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो, तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ या सुरेश भटांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोलले आहे, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे, त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही.”
सणाचे वैशिष्ट्य आणि शुभेच्छा
व्हिडीओच्या शेवटी कुशल या सणाचे एक सुंदर वैशिष्ट्य सांगतो. तो म्हणतो, “उत्तर प्रदेशात सुरू झालेली कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते आणि महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा होतो. त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची रंगत येते, हे या सणाचे मला वैशिष्ट्य वाटते.”
सर्वात शेवटी आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि मीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत, असं सांगत मिश्कीलपणे हसून तो सर्वांची रजा घेतो.
कुशलने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून, अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुशल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये त्याच्यासोबत श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार आहेत.