Marathi Celebs Dahi handi Event Fees: राज्यभरात गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, मानवी मनोऱ्यांचा थरार आणि लाखो रुपयांची बक्षीसे यांसोबतच दहीहंडी सणाला आता व्यावसायिक इव्हेंटचे आणि ग्लॅमरस रूप प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात राजकीय नेत्यांकडून आयोजित दहीहंडी महोत्सवांमध्ये गर्दी आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींना निमंत्रित करण्याची तीव्र चढाओढ दिसते. यंदा तर अनेक कलाकारांनी आपण कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी तयार असल्याचे पोस्ट शेअर करत स्वतःहून आमंत्रणे मागवली होती, ज्यामुळे या सेलिब्रिटींच्या मानधनाची जोरदार चर्चा रंगली आहे.
15 ते 20 मिनिटांच्या हजेरीसाठी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत मानधन
दहीहंडीच्या मंचावर जाऊन गोविंदांना प्रोत्साहन देणे, अभिवादन करणे किंवा एखाद्या गाण्यावर क्षणभर थिरकणे यासाठी सेलिब्रिटी तगडी बिदागी वसूल करतात. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आणि लोकप्रिय अभिनेते अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या हजेरीसाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत मानधन घेत असल्याचे समोर आले आहे. जर मंचावर विशेष डान्स परफॉर्मन्स करायचा असेल, तर हे मानधन आणखी वाढते. तर दुसरीकडे, छोट्या पडद्यावरील मालिकांमधील प्रसिद्ध चेहरे व नवोदित कलाकार 20,000 ते 80,000 रुपयांपर्यंतच्या मानधनात हजेरी लावतात.
गायक, संगीतकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मोठी मागणी
मंचावर लाईव्ह गाणी गाऊन वातावरणनिर्मिती करण्यासाठी गायक व संगीतकारांना 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतची बिदागी दिली जाते. याशिवाय, गेल्या 3 ते 4 वर्षांत इन्स्टाग्राम व युट्यूबवरील प्रसिद्ध 'सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स'ची मागणी प्रचंड वाढली आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आयोजक मंडळे या इन्फ्लुएन्सर्सना 25,000 ते 1 लाख रुपये देऊन आमंत्रित करत आहेत. 'सबसे कातिल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी पाटीलच्या डान्स शोला सध्या सर्वात जास्त मागणी असून, ती सामान्य कार्यक्रमासाठी 80,000 ते 1.5 लाख रुपये घेते; मात्र दहीहंडीसाठी हे मानधन आणखी वाढवले जाते.
एकाच दिवसात मुंबई ते पुणे कलाकारांची मोठी धावपळ
दहीहंडीचा हा एक दिवस मराठी कलाकारांसाठी मोठी आर्थिक कमाई करून देणारा 'जॅकपॉट' ठरतो. एकाच दिवसात जास्तीत जास्त कमाई करण्यासाठी कलाकार एकापाठोपाठ एक अशा 4 ते 5 ठिकाणी हजेरी लावताना दिसतात. अनेक कलाकार सकाळी मुंबई आणि ठाण्यातील विविध आयोजनांमध्ये सहभागी होतात, तर संध्याकाळी पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमांसाठी धावपळ करतात. मुंबईतील मोठ्या राजकीय दहीहंडी महोत्सवांमध्ये तर चित्रपटांच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे मोठे चेहरे देखील 5 लाख रुपयांपर्यंत मानधन घेऊन झळकतात.
कोट्यवधींची बक्षीसे आणि आर्थिक उलाढाल
आयोजकांमध्ये सेलिब्रिटी आणण्याच्या स्पर्धेसोबतच बक्षिसांची खैरात करण्यातही मोठी शर्यत लागलेली असते. ठाण्यातील दहीहंडीत 11 थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 21 लाख रुपये, तर इतर थरांसाठी 11 लाख आणि 5 लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. कुठे एकूण 55 लाखांची बक्षिसे तर कुठे 1,11,111 रुपयांची विशेष रक्कम देण्यात येत आहे. या सर्व भव्य आयोजनांमुळे आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीमुळे दहीहंडी उत्सव हा सांस्कृतिक परंपरेपेक्षाही एक मोठा व्यावसायिक इव्हेंट बनला आहे.