Israel Airstrike On Lebanon: लेबनॉनमध्ये युद्धविरामानंतर काही तासांतच पुन्हा रक्तपात; इस्रायली हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू

दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

Israel Airstrike On Lebanon: लेबनॉनमध्ये युद्धविरामानंतर काही तासांतच पुन्हा रक्तपात; इस्रायली हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू

Israel Airstrike On Lebanon: लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात झालेला युद्धविराम लागू होऊन काही तास उलटत नाहीत, तोच शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इराण-समर्थित हिजबुल्ला गटाने डागलेल्या क्षेपणास्त्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या ताज्या संघर्षामुळे काही महिन्यांच्या तणावानंतर अमेरिका आणि इराणच्या मध्यस्थीने झालेला हा नाजूक शांतता करार धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

रात्रीच्या वेळी 50 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा
लेबनॉनच्या 'एनएनए' (NNA) या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इस्रायली लढाऊ विमाने आणि ड्रोनने दक्षिण लेबनॉनमधील निवासी भागांना लक्ष्य केले. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाने रात्रीच्या सुमारास दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांवर 50 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यानंतर इस्रायलने हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. मात्र, हिजबुल्लाने या क्षेपणास्त्र हल्ल्याची अधिकृत जबाबदारी घेतलेली नाही.

निवासी इमारतीवर हल्ला; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
या कारवाईदरम्यान सर्वात भीषण आणि प्राणघातक हल्ला टायर (Tyre) जिल्ह्यातील 'बारिश' (Barish) शहरात झाला. येथे एका तीन मजली निवासी इमारतीवर इस्रायली क्षेपणास्त्र पडल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, लेबनीज सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, 'कफरुम्मन-नबातीह' रस्त्यावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात लेबनॉनचा एक सैनिकही मारला गेला आहे. इस्रायलकडून जाणीवपूर्वक शांततेच्या प्रयत्नांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप लेबनीज सैन्याने केला आहे.

"सैन्य असेपर्यंत प्रतिकार सुरूच राहील"
दुसरीकडे, हिजबुल्लाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायली सैन्य लेबनॉनच्या भूभागावर उपस्थित आहे, तोपर्यंत त्यांना कोणत्याही हालचालींचे स्वातंत्र्य दिले जाणार नाही. जोपर्यंत परकीय सैन्य देशात आहे, तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे, अशी आक्रमक भूमिका हिजबुल्लाने घेतली आहे.

इस्रायलचा कराराच्या उल्लंघनाचा आरोप
इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, हिजबुल्लाने जर शत्रुत्व आणि कराराचे उल्लंघन करणे थांबवले, तरच या भागात कायमची शांतता नांदू शकते. सुरक्षा क्षेत्रात इस्रायली सैन्याची उपस्थिती केवळ हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी आणि संभाव्य धोके दूर करण्यासाठी आहे, नागरिकांना हानी पोहोचवणे हा आमचा हेतू नाही, असा दावा त्यांनी केला.

युद्धविरामाची पार्श्वभूमी आणि जीवितहानी
हा ऐतिहासिक युद्धविराम शुक्रवारी दुपारी 4 वाजता लागू झाला होता, ज्याला अमेरिका, इराण, इस्रायल आणि हिजबुल्ला या सर्व घटकांनी दुजोरा दिला होता. मात्र, अमेरिका-इराण समझोत्यातील काही अटींना वाटाघाटीत सामील नसलेल्या इस्रायलचा आधीपासूनच विरोध होता.

हेही वाचा – Donald Trump: व्हेनेझुएला आणि इराणनंतर 'हा' देश अमेरिकेच्या रडारवर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2 मार्चपासून झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 3912 लोकांचा बळी गेला आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला, मुले आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, या अलीकडच्या संघर्षात किमान 32 इस्रायली सैनिक आणि चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number