YouTube New Monetization Rules: डिजिटल विश्वात व्हिडिओ कंटेंट तयार करून कमाई करणाऱ्या नवीन आणि नवोदित युट्यूबर्ससाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. युट्यूबने आपल्या प्रसिद्ध 'यूट्यूब पार्टनर प्रोग्राम' (YPP) अंतर्गत जाहिराती आणि 'यूट्यूब प्रीमियम'द्वारे मिळणाऱ्या महसूल वाटपाच्या (Monetization) नियमांमध्ये मोठे आणि कठोर बदल घोषित केले आहेत. विशेषतः नवीन क्रिएटर्सना आता आपल्या चॅनेलवरून कमाई सुरू करण्यासाठी आधीपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागणार आहे.
1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार नवे पात्रता निकष
यूट्यूबने स्पष्ट केले आहे की, हे नवीन सुधारित नियम 1 फेब्रुवारी 2027 पासून अधिकृतपणे लागू केले जातील. यानंतर जाहिरातींच्या माध्यमातून कमाई सुरू करू इच्छिणाऱ्या नवीन क्रिएटर्सना खालीलपैकी एका अटीची पूर्तता करावी लागेल:
लॉन्ग व्हिडिओ
चॅनेल मॉनेटाईज करण्यासाठी मागील 365 दिवसांत तब्बल 8,000 'क्वालिफाईड वॉच अवर्स' (तास) पूर्ण करणे अनिवार्य असेल. यापूर्वी ही अट 4,000 तासांची होती.
यूट्यूब शॉर्ट्स
शॉर्ट्स बनवणाऱ्या क्रिएटर्सना मागील 90 दिवसांच्या कालावधीत तब्बल 2 कोटी 'क्वालिफाईड शॉर्ट्स व्ह्यूज'चा टप्पा गाठावा लागेल. ही मर्यादा आधी 1 कोटी व्ह्यूज इतकी होती. कंपनीनुसार, 2018 नंतर YPP च्या नियमांत केलेला हा सर्वात मोठा बदल आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हे नियम फक्त नवीन अर्जांसाठी असतील; आधीपासून YPP चा भाग असलेल्या युट्यूबर्सवर या वाढीव मर्यादेचा कोणताही परिणाम होणार नाही.
उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कमाईचे इतर पर्याय खुले
जे क्रिएटर्स जाहिरातींवर आधारित वाढीव निकष पूर्ण करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी यूट्यूबने कमाईचे इतर मार्ग खुले ठेवले आहेत. 'सुपर चॅट', 'सुपर थँक्स' 'चॅनेल मेंबरशिप्स' आणि 'यूट्यूब शॉपिंग यांसारख्या 'फॅन फंडिंग' फीचर्ससाठीचे नियम बदलण्यात आलेले नाहीत.
तसेच, जे क्रिएटर्स आधीच शॉर्ट्सद्वारे कमाई करत आहेत, त्यांना आपला महसूल सुरू ठेवण्यासाठी मागील 90 दिवसांत 10 दशलक्ष व्ह्यूजची मर्यादा कायम ठेवावी लागेल. जर एखाद्याचा व्ह्यूजचा आलेख यापेक्षा खाली आला, तरीही त्यांचे चॅनेल प्रोग्राममधून हटवले जाणार नाही. पुन्हा 10 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा गाठताच कमाईची प्रक्रिया आपोआप पूर्ववत होईल.
यूट्यूबने निकष कडक करण्यामागचे कारण
आपल्या अधिकृत ब्लॉगवर माहिती देताना यूट्यूबने सांगितले की, प्लॅटफॉर्मवर झालेली अभूतपूर्व वाढ हे या निर्णयामागचे मुख्य कारण आहे. सध्या यूट्यूबवर दररोज 200 दशलक्ष पेक्षा जास्त शॉर्ट्स व्ह्यूज मिळतात, तर टीव्ही स्क्रीनवर दररोज 1 दशलक्ष तासांहून अधिक कंटेंट पाहिला जातो. सध्या YPP मध्ये 3 दशलक्ष पेक्षा जास्त सक्रिय क्रिएटर्स समाविष्ट आहेत. उच्च दर्जाचा आणि दर्जेदार कंटेंट तयार करणाऱ्या सक्रिय युट्यूबर्सना अधिक चांगला मोबदला देण्याच्या उद्देशाने ही नवी प्रणाली आखण्यात आली आहे. या नव्या रचनेमुळे 2026 च्या तुलनेत 2027 मध्ये क्रिएटर्सना अधिक कमाई करता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.