Nepal Flood: नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या अभूतपूर्व आणि अनियंत्रित पुरामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. या अचानक आलेल्या महापुरात सुमारे 384 पर्यटक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने जाहीर केली आहे. चिंतेची बाब म्हणजे या बेपत्ता पर्यटकांमध्ये किमान 105 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या आपत्तीनंतर नेपाळ पर्यटन मंडळ, पर्यटक पोलीस, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी विविध ट्रॅव्हल एजन्सी आणि गाईड्सशी समन्वय साधून बेपत्ता पर्यटकांचा शोध व सुरक्षितता पडताळण्याची मोहीम अत्यंत वेगाने सुरू केली आहे.
परदेशी व नेपाळी पर्यटकांची आकडेवारी अन् 10 एजन्सींकडून संकलित माहिती
नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता 384 पर्यटकांच्या यादीत 291 परदेशी, 93 नेपाळी नागरिक आणि 37 ‘अनिवासी भारतीय’ (NRI) यांचा समावेश आहे. भारतीयांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिकेतील पर्यटकांचाही यात समावेश आहे. बाधित भागात कार्यरत असलेल्या 10 प्रमुख ट्रॅव्हल एजन्सींकडून मिळालेल्या नोंदींनुसार, ‘ट्रेकर्स सोसायटी’चे 92, ‘सम्राट टूर्स’चे 71, ‘लीफ हॉलिडे’चे 55, ‘हिमालयन ग्लेशियर’चे 52, ‘कैलास जर्नी’चे 31 आणि ‘फिशटेल टूर्स’चे 27 पर्यटक सध्या संपर्काबाहेर आहेत. याशिवाय इतर लहान-मोठ्या एजन्सींच्या प्रवाशांचाही शोध घेतला जात आहे.
बिहार प्रशासनाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन आणि गंडक बॅरेजचे सर्व 36 दरवाजे उघडले
नेपाळमधील या महापुराचा थेट फटका भारतातील सीमावर्ती राज्यांना बसण्याची शक्यता असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने कंबर कसली आहे. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढण्याचा इशारा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक (DGP) यांच्या देखरेखीखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाल्मिकीनगर येथील गंडक बॅरेजचे सर्व 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – Bhote Koshi River Flood: विनाशकारी पुरामुळे हाहाकार; 1000 लोकं वाहून गेल्याची भीती, हायवे अन् पूल उद्ध्वस्त
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा करून मी शोकसंवेदना व्यक्त केली. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नेपाळला सर्वतोपरी मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे. बचाव आणि मदतकार्याबाबत आमची पथके जवळून समन्वय साधत आहेत.’
Spoke to Prime Minister Balendra Shah and conveyed condolences on the loss of lives due to the floods in Nepal. The people of India stand in solidarity with their sisters and brothers in Nepal at this difficult time. India is ready to provide all possible humanitarian… — Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
उत्तर प्रदेशातील महाराजगंज व कुशीनगर जिल्ह्यांत अलर्ट; योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली चिंता
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोटेकोशी नदीच्या विनाशावर अत्यंत चिंता व्यक्त करत बाधित लोकांच्या सुरक्षिततेसाठी पशुपतिनाथांच्या चरणी प्रार्थना केली आहे. गंडक आणि नारायणी नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने त्यांनी महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांतील प्रशासनाला पूर्णपणे हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सीमावर्ती भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाला तटबंधांची 24 तास पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.