Arunachal Pradesh Girl Viral Video : अरुणाचल प्रदेशातील ईटानगर येथे राहणाऱ्या एका लहान मुलीने तिच्या चेहऱ्याच्या रचनेवरून आणि रूपावरून करण्यात आलेल्या टिप्पणीवर अत्यंत समर्पक व भावनिक उत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर कार्गा टिंकल गोंगू नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ आणि मेसेज शेअर करण्यात आला आहे. भारतीय असूनही तिला चिनी मानणाऱ्या आणि कमेंट करणाऱ्या लोकांना तिने या व्हिडिओद्वारे भारताची खरी ओळख करून दिली आहे.
व्हिडिओमधील लहान मुलीची भावनिक हाक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चिमुकलीने अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात आपले मत मांडले आहे:
‘माझे बाबा भारतीय आहेत, आम्हीसुद्धा भारतीय आहोत आणि ईटानगरमध्ये राहतो,’ असे सांगत तिने आपली भारतीय ओळख स्पष्ट केली आणि भारतीय असल्याविषयीचा अभिमानही व्यक्त केला. तसेच, ‘लोकांनी आम्हाला चिनी म्हटल्यावर मला खूप राग येतो आणि खूप वाईट वाटते,’ असे आवर्जून सांगत तिने खंतही व्यक्त केली. यासोबतच, ‘आम्हाला चिनी म्हणू नका, आम्हाला भारतीय म्हणा,’ अशी प्रेमळ विनंती तिने सर्वांना केली.
भारताच्या विविधतेवर मुलीची भाष्य करणारी पोस्ट
व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तिने भारतातील विविधतेचा गौरव केला आहे. ‘कदाचित माझा चेहरा तुम्ही भारतीय कसा दिसतो अशी कल्पना करता तसा नसेल, पण भारत हा नेहमीच वेगवेगळे चेहरे, संस्कृती, भाषा आणि परंपरा यांचा एक सुंदर संगम राहिला आहे. मला मी कोण आहे आणि कुठून आले आहे याचा अभिमान आहे. मला हिंदी बोलता येते याचाही मला आनंद आहे,’ असे तिने नमूद केले. तसेच, ‘चिनी मुले हिंदी बोलू शकतात’ या कमेंटवर उत्तर देताना, लोकांनी पूर्वग्रह न ठेवता अधिक जिज्ञासू आणि संवेदनशील असले पाहिजे, शेवटी आपण सर्व आधी माणूस आहोत, असा संदेश तिने दिला.
नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव आणि समर्थन
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हजारो लोकांनी या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करून तिला तू खरी भारतीय आहेस असे सांगत दिलासा दिला. ‘बाळा दुःखी होऊ नकोस, तू खूप गोड भारतीय मुलगी आहेस,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काहींनी ‘मोठमोठी भाषणे देणाऱ्यांपेक्षा तू अधिक खरी भारतीय आहेस,’ अशा शब्दांत तिचे आणि तिच्या कुटुंबाचे कौतुक केले.
ईशान्य भारताची ओळख आणि जनजागृती
भारताच्या पूर्वोत्तर भागातील नागरिकांना त्यांच्या शारीरिक रचनेमुळे वारंवार अशा भेदभावाला किंवा अज्ञानाला सामोरे जावे लागते. या लहान मुलीच्या निष्पाप पण खंबीर उत्तराने सोशल मीडियावर ईशान्य भारतातील नागरिकांच्या ओळखीबाबत आणि भेदभावाविरोधात एक मोठी चर्चा सुरू केली आहे. माणसाचा चेहरा किंवा भाषा त्याची राष्ट्रीयत्व ठरवू शकत नाही, हेच या व्हिडिओने संपूर्ण देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
हेही वाचा – Coconut Burfi: रक्षाबंधन स्पेशल! भावासाठी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाची बर्फी; सोपी रेसिपी जाणून घ्या