Swabhimaan Parv: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून गुजरातच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असून, राजकोटमधील हिरासर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ असून, पंतप्रधान यामध्ये सहभागी होत भारताच्या समृद्ध सभ्यतागत आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करणार आहेत. सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गझनवीने केलेल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण होत असताना, हे मंदिर भारताच्या लवचिकता, राष्ट्रीय अभिमान आणि अतूट भक्तीचे प्रतीक म्हणून पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.
72 तासांचा अखंड जप आणि शौर्य यात्रा
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून शेकडो संत सोमनाथ येथे दाखल झाले आहेत. ‘ओम’ मंत्राच्या 72 तासांच्या अखंड जपाने संपूर्ण मंदिर परिसर आध्यात्मिक उर्जेने भारून गेला आहे. या पर्वाचे खास आकर्षण म्हणजे रविवारी, 11 जानेवारी रोजी निघणारी ‘शौर्य यात्रा’. सकाळी 9:45 वाजता निघणाऱ्या या औपचारिक मिरवणुकीत 108 घोड्यांची प्रतीकात्मक परेड होणार असून, त्याद्वारे शतकानुशतके मंदिराचे रक्षण करणाऱ्या शूर योद्ध्यांना मानवंदना दिली जाईल. पंतप्रधान स्वतः या यात्रेत सहभागी होऊन भारताच्या शौर्याचा सन्मान करतील.
सोमनाथ स्वाभिमान पर्व हमारी आध्यात्मिक परंपरा का एक सशक्त प्रतीक है, जिसे देशभर में पूरी श्रद्धा, भक्ति और उल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी कड़ी में कल रात करीब 8 बजे सोमनाथ मंदिर में ओंकार मंत्र के दिव्य जाप का हिस्सा बनने का सौभाग्य मिलेगा। इसके अगले दिन सुबह लगभग 9:45 बजे… — Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026
पुनर्बांधणीची 75 वर्षे आणि आधुनिक सोहळा
दरम्यान, 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे ही वर्ष आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पुनर्बांधणीमुळे मंदिराला प्राचीन वैभव प्राप्त झाले होते. पंतप्रधान मोदींनी या सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, ‘स्वाभिमान पर्व हे आपल्या आध्यात्मिक परंपरेचे आणि भारतमातेच्या असंख्य शूर सुपुत्रांच्या बलिदानाचे प्रतिबिंब आहे.’ संध्याकाळच्या वेळी होणारा भव्य ड्रोन शो आणि मंत्रोच्चार मंदिराच्या ऐतिहासिक भूमिकेवर प्रकाश टाकणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिरात विशेष पूजा आणि दर्शन घेणार असून, त्यानंतर एका जाहीर सभेतून देशवासियांना संबोधित करतील. या दौऱ्यामुळे सोमनाथच्या धार्मिक पर्यटनाला आणि सांस्कृतिक अस्मितेला नवी चालना मिळणार आहे.