पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीत मोठी घोषणा केली आहे. पोलिसांच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ८६० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिले आहे.
अजित पवार यांच्या हस्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस आमदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास हसन मुश्रीफ, श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांसाठी ८६० कोटी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात तडजोड करण्यात आली नसल्याचेही अजित पवार म्हणाले. तसेच जिल्हा नियोजनातून पोलिसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पवार म्हणाले.