11 Airports PPP Model Privatization: देशभरातील 11 लहान-मोठ्या विमानतळांचे कामकाज खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या प्रस्तावाला 'सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने' (PPPAC) तत्त्वतः मान्यता दिली आहे. 'सार्वजनिक-खासगी-भागीदारी' (PPP) प्रारूपाचा वापर करून ही विमानतळे 50 वर्षांच्या कालावधीसाठी खाजगी कंपन्यांना सवलतीच्या दरात भाड्याने दिली जातील. या विमानतळांचे संचालन व विकास करण्यासाठी खाजगी क्षेत्राकडून सुमारे 8,622 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5 गटांमध्ये विमानतळांची विभागणी; मक्तेदारी रोखण्यासाठी कमाल मर्यादा
4 ऑगस्ट रोजी झालेल्या PPPAC बैठकीनुसार, 6 लहान विमानतळे ही 5 मोठ्या विमानतळांच्या गटात समाविष्ट केली जातील. यामध्ये अमृतसर आणि कांगडा-गग्गल विमानतळ वाराणसीसोबत एका गटात ठेवले जाईल. याशिवाय गया व कुशीनगर, भुवनेश्वर व हुबळी, आणि रायपूर व औरंगाबाद अशी गटवारी करण्यात आली असून तिरुचरापल्ली आणि तिरुपती ही दोन विमानतळे स्वतंत्र गटात असतील. बाजारातील मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी एकाच बोलीदाराला किती विमानतळे द्यायची, यावर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर आहेत.
मुंबई विमानतळाच्या 'टी-1' टर्मिनलवर जानेवारी 2027 पासून हातोडा
दुसऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीत, 'मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड'द्वारे (MIAL) चालवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 80 वर्षे जुने असलेले 'T-1' टर्मिनल 15 जानेवारी 2027 पासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. सध्या या टर्मिनलचा काही भाग पाडलेला असून तेथील हवाई वाहतूक 'T-2' आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता आणि नवी व्यवस्था
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या दररोज 950 पेक्षा जास्त विमानांचे आवागमन होते आणि त्याची वार्षिक प्रवासी क्षमता 5 कोटींहून अधिक आहे. यामध्ये जुन्या 'T-1' ची क्षमता 1.50 कोटी तर 'T-2' ची प्रवासी क्षमता 4 कोटी इतकी आहे. 'T-1' पाडल्यानंतर तेथील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 'T-2' तसेच नवी मुंबई विमानतळाचा वापर पूर्ण क्षमत्याने केला जाणार आहे.
हेही वाचा – MMDR Act: भारताची खनिज संपत्ती संरक्षित कोण करणार?