105 Year Old Convict Life Sentence Waiver: भारतातील सर्वात वृद्ध कैदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 105 वर्षीय रसिक चंद्र मोंडल यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे माफ केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मोंडल यांचे वाढते वय आणि अत्यंत खालावलेली प्रकृती लक्षात घेता, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवणे अयोग्य ठरेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. नोव्हेंबर 2024 मध्ये मिळालेल्या अंतरिम जामिनाला आता अंतिम मंजुरी देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील सर्व कायदेशीर प्रक्रिया अधिकृतपणे थांबवली आहे.
मालदा जिल्ह्यातील जमिनीचा वाद; 1988 मधील भावाच्या हत्येचे प्रकरण
हे संपूर्ण प्रकरण पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील आहे. 1920 मध्ये जन्मलेल्या रसिक चंद्र मोंडल यांचा 1988 मध्ये भावाशी (सुरेश मोंडल) सुपीक जमिनीच्या मालकीवरून वाद झाला होता. या वादातून नोव्हेंबर 1988 मध्ये सुरेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भावाच्या पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रसिक मोंडल यांच्यासह काही जणांना अटक केली. त्यानंतर डिसेंबर 1994 मध्ये ट्रायल कोर्टाने 68 वर्षांच्या मोंडल यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा – Khavadya Dongar Case: आयफोनचा हट्ट की कौटुंबिक वाद? खवड्या डोंगर दुर्घटनेबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा
30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास; तीन दशकांचा प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष
शिक्षेच्या घोषणेनंतर मोंडल यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, परंतु 2018 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावून शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जिथे 2019 मध्ये त्यांची याचिका फेटाळली गेली. जवळपास तीन दशकांपेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतरही मोंडल यांनी आपला कायदेशीर लढा सुरूच ठेवला होता.
99 व्या वर्षी दाखल केली होती सुटकेची याचिका; अखेर वयाच्या 105 व्या वर्षी मुक्तता
2020 मध्ये वयाची 99 वर्षे पूर्ण झाल्यावर गंभीर आजारपणाचा दाखला देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नवीन रिट याचिका दाखल केली आणि मानवतेच्या आधारावर वेळेपूर्वी सुटकेची (Premature Release) मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांना पॅरोलवर अंतरिम जामीन मंजूर केला होता. अखेर 105 व्या वर्षी न्यायालयाने त्यांना उर्वरित शिक्षेतून पूर्ण सूट देत एक मुक्त नागरिक म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
हेही वाचा – मध्यरात्रीनंतर जिल्हा रुग्णालयातील NICU च्या वॉर्मरला भीषण आग; 3 नवजात बालके गंभीररीत्या भाजली