Aadhaar Card Update: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक सुविधा सुरू केली आहे. आता स्वतःच्या नावावर पत्त्याचा पुरावा (Address Proof) नसला, तरीही आधारवरील पत्ता बदलणे शक्य होणार आहे. विशेषतः कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी ही नवी प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
'कुटुंब प्रमुख' (HoF) आधारावर होणार बदल
UIDAI च्या नवीन सुविधेनुसार, आता कोणताही आधारधारक आपल्या 'कुटुंब प्रमुखाच्या' (Head of Family) संमतीने पत्ता अद्ययावत करू शकतो. ज्यांच्याकडे स्वतःचे रेशन कार्ड किंवा वीजबिल यांसारखी कागदपत्रे नाहीत अशा मुलांसाठी, पत्नीसाठी किंवा पालकांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे. यासाठी फक्त कुटुंब प्रमुखासोबतच्या नात्याचा पुरावा (उदा. लग्नपत्रिका, गुणपत्रिका किंवा पासपोर्ट) आवश्यक असेल. जर नात्याचा पुरावा नसेल, तर कुटुंब प्रमुख 'स्व-घोषणा पत्र' (Self-declaration) देऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
पत्ता अपडेट करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
तुमचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे सोप्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील:
'My Aadhaar' पोर्टलला (https://myaadhaar.uidai.gov.in) भेट देऊन लॉग-इन करा.
पत्ता अपडेट करण्याचा नवीन पर्याय निवडा आणि तेथे तुमच्या कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
नात्याचा पुरावा दर्शवणारे कागदपत्र अपलोड करून आवश्यक शुल्क भरा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सेवा विनंती क्रमांक (SRN) मिळेल आणि कुटुंब प्रमुखाला मेसेज जाईल.
कुटुंब प्रमुखाने 30 दिवसांच्या आत पोर्टलवर लॉग-इन करून या विनंतीला मंजुरी देणे बंधनकारक आहे.
लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या अटी
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, जर कुटुंब प्रमुखाने 30 दिवसांच्या आत विनंती स्वीकारली नाही किंवा ती नाकारली, तर अर्जाची प्रक्रिया आपोआप बंद होईल. अशा परिस्थितीत भरलेले शुल्क परत मिळणार नाही, याची विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन करता येत असल्याने आता आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज उरणार नाही.