PAN Number Misuse Scam: घरची जेमतेम परिस्थिती असलेले ओमजी शुक्ला एका खाजगी आस्थापनात अवघ्या 10 हजार रुपये पगारावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. उभ्या आयुष्यात कधीही लाखभर रुपये एकत्र न पाहिलेल्या शुक्ला यांच्या हातात अचानक केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) विभागाकडून 3,14,56,116 रुपये म्हणजेच तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक कराच्या वसुलीची नोटीस पडली. त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर करून 'ओम एंटरप्रायझेस' नावाची कापड व्यवसायाशी संबंधित बनावट कंपनी स्थापन करण्यात आली होती आणि त्या कंपनीद्वारे 17,47,56,200 रुपये इतक्या प्रचंड रकमेची उलाढाल दाखवण्यात आली होती.
नोकरी गेली.. कर विभागाच्या नोटीसमुळे रेशन कार्ड रद्द होऊन सरकारी लाभही बंद
जीएसटी नोटीस आल्यापासून शुक्ला यांच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण झाले. आपल्या नावावर झालेला हा मोठा घोटाळा सिद्ध करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी ते सरकारी कार्यालयांचे सतत खेटे मारू लागले. वारंवार कामावर अनुपस्थित राहावे लागल्यामुळे त्यांची सिक्युरिटी गार्डची नोकरीही सुटली. एवढेच नव्हे तर सरकारी दप्तरी शुक्ला करोडपती व्यापारी म्हणून नोंदवले गेल्यामुळे त्यांचे शिधापत्रिका (रेशन कार्ड) रद्द करण्यात आले आणि सर्व धान्य व इतर सरकारी लाभही बंद झाले. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील नौबस्ता भागातील रहिवासी असलेले ओमजी शुक्ला न्यायासाठी झगडत आहेत. काम बंद झाल्यामुळे उद्याचे काय… हा प्रश्न त्यांच्यासमोर 'आ' वासून उभा राहिला आहे.
हेही वाचा – SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! रोख पैसे काढण्याच्या नियमांत बदल; इतक्या व्यवहारांनंतर अतिरिक्त शुल्क
पोलीस आयुक्तांसमोर अश्रू अनावर; क्राईम ब्रांचकडे सोपवला प्रकरणाचा तपास
न्यायासाठी वर्षभर दारोदारी भटकल्यानंतर ओमजी शुक्ला यांनी कानपूरचे पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आयुक्तांसमोर आपले गाऱ्हाणे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणातील गंभीर गैरव्यवहार पाहता पोलीस आयुक्तांनी नौबस्ता पोलीस ठाण्यात तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तपास थेट क्राईम ब्रांचकडे सोपवला आहे.
व्यापारी संघटनेचे जीएसटी विभागाच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक व्यापारी संघटनांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोणताही नवीन जीएसटी क्रमांक जारी करण्यापूर्वी जागेची योग्य ती पाहणी, छायाचित्रे आणि ओळखपत्रांची सखोल पडताळणी केली जाणे अत्यंत अनिवार्य असते. अशा स्थितीत एका साध्या सुरक्षा रक्षकाच्या नावाने कोट्यवधींची कंपनी उभी राहून व्यवहार होईपर्यंत अधिकाऱ्यांच्या लक्षात हे कसे आले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या आर्थिक अडचणींशी लढा देणाऱ्या ओमजी शुक्ला यांना आता क्राईम ब्रांचच्या तपासाकडूनच न्यायाची आशा आहे.