Fuel Price Hike: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक तणावामुळे तेल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याने, हा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कच्च्या तेलाचा 'भाव' कडाडला
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 126 डॉलरपर्यंत पोहोचले होते. सध्या हा दर 110 डॉलरच्या वर स्थिरावला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा फटका
फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या संघर्षामुळे तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या युद्धामुळे महत्त्वाचे सागरी मार्ग बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढला आहे. गेल्या चार वर्षांपासून किरकोळ विक्रीचे दर स्थिर असल्याने सरकारी तेल कंपन्यांना डिझेल आणि पेट्रोलच्या विक्रीतून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ अपरिहार्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
किती रुपयांची होऊ शकते वाढ?
बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, तेल कंपन्यांवरील दबाव पाहता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 ते 28 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. मात्र, 'इंडियन ऑईल'ने (IOC) सध्या तरी अशा कोणत्याही अधिकृत दरवाढीची घोषणा केलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा संसाधनांच्या किमती वाढत असल्या तरी घरगुती एलपीजी आणि इंधनाचे दर सध्या स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सामान्यांची चिंता वाढली
जर पेट्रोल आणि डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे एलपीजीच्या दणक्यानंतर इंधन दरवाढीचा हा संभाव्य झटका सर्वसामान्यांसाठी 'दुबऴ्यावर दोन मुंग्या' असाच ठरणार आहे.