Pune CNG Price Hike: आधीच पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींमुळे हैराण असलेल्या पुणेकरांना आता सीएनजीच्या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे नवीन दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे रिक्षाचालक आणि सीएनजी गाड्या वापरणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे आहेत.
सीएनजीचे ताजे दर काय?
पुणे आणि लगतच्या परिसरात आता सीएनजीसाठी ग्राहकांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे.
जुना दर: 92.50 रुपये प्रति किलो
नवा दर: 94.50 रुपये प्रति किलो
वाढ: थेट 2 रुपये
दरवाढीमागे जागतिक युद्धाचे सावट?
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक इंधन बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीवर झालेला परिणाम, यामुळे ही दरवाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात सीएनजी महागल्याने आता शहरातील रिक्षा संघटनांकडून पुन्हा एकदा भाडेवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे.
प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी वाढ
एकीकडे सीएनजी महागलेला असतानाच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) आपल्या ‘प्रीमियम’ श्रेणीतील इंधनांच्या किमतीतही मोठी वाढ केली आहे. सर्वाधिक शुद्ध मानले जाणारे हे शंभर-ऑक्टेन पेट्रोल आता प्रति लिटर 160 रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये लिटरमागे तब्बल 11 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. तथाी, एक्स्ट्रा ग्रीन डिझेल या प्रीमियम डिझेलच्या दरातही वाढ झाली असून, आता हे डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार? काय आहे अपडेट
सामान्यांच्या अडचणीत भर
काही दिवसांपूर्वीच घरगुती सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झाले होते. त्यानंतर आता सीएनजी आणि प्रीमियम इंधने महागल्याने मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक महागण्याची भीती व्यक्त होत आहे. हाय-एंड गाड्या वापरणाऱ्यांपासून ते दररोज सीएनजीवर रिक्षा चालवणाऱ्या कष्टकऱ्यांपर्यंत सर्वांनाच या महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.