US Dollar vs Rupee: भारतीय चलन बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. सोमवारी सकाळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 69 पैशांनी घसरून 95.17 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाने प्रथमच 95 रुपयांची पातळी ओलांडल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक घडामोडी आणि भूराजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय चलनाच्या मूल्यावर झाल्याचे दिसून येत आहे.
रुपया घसरण्यामागची प्रमुख कारणे
रुपयाच्या या मोठ्या घसरणीमागे प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मोठे कारण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने ब्रेंट क्रूडचे दर 4.17 टक्क्यांनी वधारून 105.5 डॉलर प्रति बॅरलवर गेले आहेत. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे ओढा वाढला असून डॉलर निर्देशांक 98.12 वर पोहोचला आहे.
शेअर बाजारातील पडझड आणि विदेशी गुंतवणूकदारांची पाठ
जागतिक तणावामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल काढून घेण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी सेन्सेक्स 1,000 अंशांनी, तर निफ्टी 300 अंशांनी कोसळल्याने रुपयावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपया सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी जागतिक स्तरावरील दबावामुळे रुपयाची घसरण रोखणे कठीण झाले आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ
रुपयाच्या या घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि खाद्यतेले यांच्या किमतीतही वाढ होऊ शकते. जे नागरिक परदेश प्रवासाचे किंवा शिक्षणाचे नियोजन करत आहेत, त्यांना आता डॉलर खरेदीसाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणाव कमी होईपर्यंत चलन बाजारातील ही अस्थिरता कायम राहू शकते.