Railway Ticket Rules: रेल्वेने डिजिटल तिकिटांच्या वापराबाबत अत्यंत कडक पावले उचलली आहेत. यापुढे जर तुम्ही मोबाईलवर अनारक्षित (Unreserved) तिकीट दाखवून प्रवास करणार असाल, तर केवळ मूळ अॅपमध्ये दिसणारे तिकीटच वैध मानले जाईल. अनेक प्रवासी तिकिटाचे फोटो, पीडीएफ किंवा व्हॉट्सअॅपवर आलेले स्क्रीनशॉट्स टीटीई (TTE) ला दाखवतात, परंतु रेल्वे प्रशासनाने हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे. तिकीट ज्या मोबाईल डिव्हाइस आणि नोंदणीकृत नंबरवरून बुक केले गेले आहे, त्याच फोनमध्ये ते मूळ स्वरूपात असणे बंधनकारक आहे. हा नियम केवळ जनरल/अनारक्षित तिकिटांसाठी लागू असून, आरक्षित (Reservation) तिकिटांच्या वेळी प्रवाशाचे ओळखपत्र तपासले जात असल्याने तिथे हा नियम लागू होणार नाही.
नियम माहित नसल्याने महिला प्रवाशाला बसला भुर्दंड
या नव्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका महिला प्रवाशाला प्रवासादरम्यान मोठा आर्थिक दंड सोसावा लागला आहे. कोरबा-विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस (गाडी क्रमांक 18517) मधून कोरबा ते रायपूर प्रवास करणाऱ्या एका महिलेने टीटीईने तिकीट मागितल्यावर भावाने 'रेल वन' अॅपवर बुक केलेल्या तिकिटाचा व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट दाखवला. टीटीईने या तिकिटाची बारकाईने तपासणी केली असता, गाडी कोरबा स्थानकावरून दुपारी 4:10 वाजता सुटली होती, तर ते तिकीट संध्याकाळी 4:45 वाजता बुक करण्यात आले होते. ट्रेन सुटल्यानंतर काढलेले हे तिकीट आणि मूळ अॅपऐवजी स्क्रीनशॉट दाखवल्यामुळे रेल्वेने ते अमान्य करत नियमानुसार दंड वसूल केला.
हेही वाचा – Sugar Price Hike: सणासुदीपूर्वीच साखर महागली; महिनाभरात किमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढल्या
अॅपमध्येच तिकीट दाखवणे अनिवार्य; प्रवाशांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी
रायपुर मंडळाचे सीनियर डीसीएम अवधेश कुमार त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की, रेल्वेचे तिकीट तपासणी कर्मचारी प्रवासादरम्यान कधीही 'रेल वन' अॅपमधील थेट तिकीट मागू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी आपला नोंदणीकृत मोबाईल सोबत ठेवणे आणि तो प्रवासात पुरेसा चार्ज ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तपासणीवेळी फोन बंद पडणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही स्थानकावरून ट्रेन सुटण्यापूर्वीच डिजिटल तिकीट बुक करणे अनिवार्य आहे; ट्रेन सुरू झाल्यानंतर केलेले बुकिंग ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी स्थानकाचे नाव, तारीख आणि इतर तपशील स्वतः तपासून घेणे गरजेचे आहे, कारण चुकीच्या माहितीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.