Rahul Gandhi : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तीन विषयांच्या UGC-NET परीक्षा रद्द करण्याची नामुष्की स्वीकारल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि NTA वर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडताना त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारप्रमाणेच NTA देखील आपल्या गंभीर चुका स्वीकारण्यास पूर्णपणे नकार देत आहे, असा घणाघाती आरोप करत राहुल गांधी यांनी सध्याची संपूर्ण शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याऐवजी त्यांचे ‘शोषण करणारे यंत्र’ बनल्याचे प्रतिपादन केले.
चुकीच्या प्रश्नपत्रिकांमुळे 3 विषयांच्या परीक्षा रद्द
NTA कडून इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांच्या UGC-NET परीक्षा रद्द करून त्या नव्याने घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. 22 जून ते 30 जून या कालावधीत पार पडलेल्या या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. NTA ने छपाई, व्याकरण, भाषांतर आणि स्पेलिंगमधील मोठ्या चुका झाल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. याशिवाय, जुनेच प्रश्न संच पुन्हा विचारल्याच्या तक्रारीही उमेदवारांकडून करण्यात आल्या होत्या. आता या तिन्ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पुनर्परीक्षेच्या स्वरूपात घेतल्या जाणार असून, यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
Modi ji, look at what your NTA has just done. UGC-NET exams for Sociology, English and Commerce were held between 22 and 30 June. Nearly two months later, NTA has cancelled all three because it set faulty papers and repeated old questions. Thousands of candidates who prepared… https://t.co/TUMhhMhjvL — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2026
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि वेळेचे नुकसान
राहुल गांधी यांनी नमूद केले की, परीक्षा संपल्यानंतर तब्बल 2 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर NTA ने हे पेपर रद्द केले आहेत. ज्या हजारो उमेदवारांनी या परीक्षेच्या तयारीसाठी आपली महत्त्वाची वर्षे खर्ची घातली, भरमसाठ शुल्क भरले आणि दूरवरच्या परीक्षा केंद्रांवर प्रवास केला, त्यांना आता या सर्व प्रक्रियेतून पुन्हा जावे लागणार आहे. NTA च्या निष्काळजीपणाची आणि अकार्यक्षमतेची शिक्षा नाहक विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे. ही व्यवस्था विद्यार्थ्यांचे पैसे, वेळ, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास हिरावून घेत असून त्यांना बदल्यात रोजगारही देऊ शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – मोठी बातमी! रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला; गोगावले-महाजनांच्या नावाची घोषणा?
NTA च्या नेतृत्वाला उत्तरदायी धरण्याची मागणी
शिक्षणाचा ह्रास करणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आपण कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथेही आवाज उठवला होता आणि पुढेही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा पुनरुच्चार त्यांनी केला. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटले होते का, या मूळ प्रश्नाचे उत्तर NTA अजूनही लपवत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही केवळ पहिली पायरी असून NTA च्या संपूर्ण नेतृत्वाला यासाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी जोरदार मागणी राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केलेली ही अकार्यक्षम व्यवस्था सुधारत नाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला.