Shivaji Park NEET Protest : शिवाजी पार्कवर हजारो तरुणांचा एल्गार; आदित्य ठाकरेंच्या फोनवरून अभिजित दिपकेंचा मुंबईतील तरुणांशी संवाद

आंदोलनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत आंदोलन करत असलेले युवा नेते अभिजित दिपके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला.

Shivaji Park NEET Protest : शिवाजी पार्कवर हजारो तरुणांचा एल्गार; आदित्य ठाकरेंच्या फोनवरून अभिजित दिपकेंचा मुंबईतील तरुणांशी संवाद

Shivaji Park NEET Protest : मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधात हजारो युवक रस्त्यावर उतरले होते. हातात तिरंगा ध्वज घेत राष्ट्रगीत गाऊन हजारो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. या मोठ्या जनआंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तरुणांच्या लढ्याला पाठिंबा दिला. गेल्या 4 दिवसांत याच ठिकाणी दुसऱ्यांदा ही मोठी सभा पार पडली.

अभिजित दिपकेंचा थेट मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद

आंदोलनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत आंदोलन करत असलेले युवा नेते अभिजित दिपके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. सीजेपी (CJP) पक्षाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन 3 प्रमुख मागण्या मांडल्याची माहिती दिपके यांनी दिली. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर विद्यार्थी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'हा नवा भारत आहे, इथे कोणी झुकणार नाही. राजीनामा घेऊनच संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणायची आहे.'

हेही वाचा – Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार? 8 वाजता मोदी सरकार करणार मोठी घोषणा

'हातात तिरंगा घेऊन हुकूमशाहीविरोधात लढू' – उद्धव ठाकरे

दरम्यान, आंदोलकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. "सरकारकडे लाठ्या आणि बंदुका असतील, पण आमच्या हातात तिरंगा आहे. दिल्लीच्या सत्तेला ही 'जन की बात' ऐकावीच लागेल," असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. तर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, सोनम वांगचुक यांचे उपोषण जरी संपले असले तरी आंदोलन सुरूच राहील. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number