Crime News: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एक अत्यंत विचित्र आणि खळबळजनक चोरीची घटना समोर आली आहे. चोरी करताना देवाचे 'पाप' लागू नये, या अंधश्रद्धेतून चोरांनी चक्क शनिदेवाच्या डोळ्यांवर काळे कापड बांधून लाखो रुपयांचे दागिने पळवले. या घटनेने नीलगिरी उपविभागातील कोलिगाडी गावात एकच खळबळ उडाली असून स्थानिक रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हनुमान मंदिरावर पहिला डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी सर्वप्रथम गावातील हनुमान मंदिराला लक्ष्य केले. मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी चांदीचे मुकुट, कडे, जोडवी, तसेच प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता यांचे मुकुट चोरले. याशिवाय हनुमानाचे लॉकेट, हार आणि चांदीची मौल्यवान भांडी घेऊन चोरटे जवळच असलेल्या शनि मंदिराकडे वळले.
पाप लागू नये म्हणून शनिदेवाचे डोळे बांधले
शनि मंदिरात चोरी करताना चोरांनी केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शनिदेवाची वक्रदृष्टी पडू नये किंवा आपण करत असलेली चोरी देवाने पाहू नये, या विचाराने चोरांनी मूर्तीच्या डोळ्यांवर काळा कपडा बांधला. "देवाने पाहिले नाही तर पाप लागणार नाही," अशा समजुतीने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर चोरांनी शनिदेवाचा चांदीचा मुकुट, सोन्याचे लॉकेट, चांदीचे कडे, जानवे, पैंजण आणि कानातले यांसह सर्व मौल्यवान अलंकार लंपास केले.
4 लाखांचा ऐवज आणि सायकलीही पळवल्या
या दोन्ही मंदिरांतून चोरून नेलेल्या साहित्याची किंमत 4 लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मंदिरातील दागिने चोरल्यानंतर चोरांनी मंदिराशेजारी लावलेल्या 2 सायकलीही नेल्या. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून रहिवाशांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
हेही वाचा – Nagpur Crime: नागपूर हादरलं! पूर्व वैमनस्यातून तरूणाला संपवलं, जादूमहल परिसरात घडली धक्कादायक घटना
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नीलगिरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून चोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून चोरांच्या या अजब प्रवृत्तीची सर्वत्र चर्चा होत आहे.