इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे मंगळवारी झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 36 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला डिस्ट्रिक्ट ज्युडिशियल कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळ झाला, जेव्हा एका पोलिस वाहनाजवळ दहशतवाद्याने स्वतःचा स्फोट घडवून आणला. हा स्फोट अशा वेळी झाला, जेव्हा पाकिस्तान आधीच अफगाणिस्तान सीमेवरील वाढत्या दहशतवादाचा सामना करत आहे. घटनेनंतर नेहमीप्रमाणे पाकिस्तानी सरकारने कोणताही ठोस पुरावा न देता या हल्ल्याचा संबंध भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भारताने हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ याने आपल्या निवेदनात म्हटले की, “इस्लामाबाद न्यायालयाबाहेरील स्फोट आणि दक्षिण वझिरिस्तानमधील वाना कॅडेट कॉलेजवरील हल्ला हे दोन्ही भारत समर्थित दहशतवादी संघटनांनी केले आहेत. हे भारताच्या प्रायोजित दहशतवादाचे उदाहरण आहे, ज्याचा उद्देश पाकिस्तानला अस्थिर करणे हा आहे.” शहबाज शरीफने पुढे दावा केला की, भारताच्या मदतीने चालणाऱ्या नेटवर्कने इस्लामाबादमधील आत्मघाती स्फोट घडवून आणला, तर त्याच नेटवर्कने अफगाणिस्तान सीमेजवळील वानामध्ये निरपराध विद्यार्थ्यांवर हल्ला केला. “ही सर्व कृत्ये भारताच्या संरक्षणाखाली अफगाण भूमीतून केली जात आहेत,” असे तो म्हणाला.
या आरोपांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “भारतावर लावण्यात येणारे हे सर्व आरोप निराधार आणि बनावट आहेत. पाकिस्तान आपल्या देशातील राजकीय अस्थिरतेकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नेहमीच भारतविरोधी कथा रचत आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला सत्याची पूर्ण जाणीव आहे आणि पाकिस्तानच्या अशा दिशाभूल करणाऱ्या युक्त्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.”
दरम्यान, पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफने देखील प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानला जबाबदार ठरवले. त्यानी म्हटले की, “पाकिस्तान सध्या युद्धस्थितीत आहे. इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाबाहेरील आत्मघाती स्फोट हा संपूर्ण देशासाठी ‘जागे होण्याचा इशारा’ आहे.” ख्वाजा आसिफ याने ‘एक्स’वर लिहिले, “जो कोणी असा समज ठेवतो की हे युद्ध केवळ अफगाण-पाकिस्तान सीमारेषेपुरते मर्यादित आहे, त्याने आजचा आत्मघाती स्फोट पाहावा. हे युद्ध आता संपूर्ण पाकिस्तानभर पसरले आहे आणि पाकिस्तानी सैन्य रोज बळी देत नागरिकांचे रक्षण करत आहे.”