Crime News: तेलंगणामध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अत्यंत क्रूरपणे संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सिया गोयल प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू असतानाच, आता याहूनही धक्कादायक असे हे प्रकरण समोर आले आहे. पेशाने परिचारिका असलेल्या या महिलेने पहिल्या प्रयत्नात पती वाचल्यानंतर, थेट रुग्णालयातच सलाईनद्वारे टॉयलेट क्लिनर देऊन त्याचा जीव घेतला.
काय आहे नेमके प्रकरण?
परदेशातून भारतात परतलेल्या प्रशांत या तरुणाला त्याची पत्नी संध्या हिच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असतं. अखेर संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांनी प्रशांतला वाटेतून हटवण्याचा कट रचला. या कटात अनिलचा मित्र साईदेखील सामील झाला होता.
पहिला प्रयत्न; इमारतीवरून खाली फेकले
ठरलेल्या योजनेनुसार, 29 जून रोजी साईने प्रशांतला दारू पाजली. त्यानंतर संध्याच्या सांगण्यावरून त्याला एका इमारतीच्या छतावर नेऊन तिथून खाली ढकलून दिले. मात्र, या भीषण अपघातानंतरही प्रशांतचा जीव वाचला. गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत नेण्यात आले आणि नंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुसरा प्रयत्न; रुग्णालयातच काढला काटा
प्रशांत पहिल्या हल्ल्यातून वाचल्यामुळे आरोपींची धाकधूक वाढली होती. अखेर प्रियकर अनिलच्या कल्पनेनुसार रुग्णालयातच त्याचा गेम करण्याचा प्लॅन ठरला. संध्या स्वतः नर्स असल्याने तिने या वैद्यकीय परिस्थितीचा गैरफायदा घेतला. उपचार सुरू असतानाच तिने प्रशांतच्या सलाईनमध्ये कॅन्युलाच्या माध्यमातून टॉयलेट क्लीनर आणि गुंगीचे औषध मिक्स केले. हे विषारी द्रावण शरीरात जाताच प्रशांतचा मृत्यू झाला.
पोलिस तपासात गूढ उकलले
पतीच्या मृत्यूला अपघाताचे रूप देण्याचा संध्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी पत्नी संध्या, प्रियकर अनिल आणि त्याचा मित्र साई या तिघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.