Crime News : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मुदलगि तालुक्यातील एका गावातून मैत्रीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पार्टीदरम्यान केवळ चिकनचे जास्त पीस खाण्यावरून झालेला किरकोळ वाद एवढा विकोपाला गेला की, एका मित्राने दुसऱ्या मित्राची चाकूने भोसकून संपवलं. मृत व्यक्तीची ओळख सीताराम म्हणून झाली असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील कबीरगंज गावचा रहिवासी होता. तो मुदलगि येथील एका स्टील कंपनीत कामाला होता.
इमारतीवरून पडल्याचा बनाव उघड; पोलिसांकडून आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम आणि आरोपी अरुण कुमार हे दोघेही एकाच गावचे रहिवासी होते आणि मुदलगि येथील एकाच कंपनीत एकत्र काम करत होते. रविवारी दोघेही एकत्र येऊन चिकन पार्टी करत होते. या दरम्यान अरुण कुमारने चिकनचे जास्त तुकडे खाल्ल्याचा आरोप करत सीतारामने त्याला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि रागाच्या भरात अरुणने सीतारामच्या छातीत थेट चाकूने वार केले.
घटनेनंतर आरोपी अरुणनेच जखमी सीतारामला गोकाक येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सीताराम इमारतीवरून खाली पडल्याचा खोटा बनाव रचला. मात्र, घटप्रभा पोलिसांनी संशयावरून अरुणची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. उपचारादरम्यान सीतारामचा मृत्यू झाला असून, घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Shocking News: जोडीदारासोबत वाद! 7 व्या मजल्यावरून पडून 23 वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी
किरकोळ कारणावरून मित्राचा बळी
चिकन खाण्यासारख्या अगदी क्षुल्लक आणि किरकोळ कारणावरून एका मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त होत आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले हे दोघेही रोजगारासाठी कर्नाटकात आले होते, परंतु एका क्षणाच्या रागाने एकाचा जीव घेतला तर दुसऱ्याचे आयुष्य तुरुंगाच्या गजाआड ढकलले आहे.