BMW Accident: राजस्थानमधील उद्योजक क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ‘शकुन ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक (MD) वल्लभ माहेश्वरी यांचे रविवारी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी झालेल्या त्यांच्या या अकाली निधनामुळे जयपूरच्या औद्योगिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. माहेश्वरी आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू (BMW) कारने जयपूरहून मथुरेकडे जात असताना हा अपघात झाला.
नियंत्रण सुटले आणि कार कल्व्हर्टवर आदळली
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात अलवर जिल्ह्यातील रेणी पोलिस स्टेशन परिसरात घडला. माहेश्वरी यांचा चालक कार चालवत होता. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अचानक नियंत्रण गमावले, ज्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेड्स तोडून थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार कल्व्हर्टच्या भिंतीवर आदळली आणि गाडीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर लगेचच दोघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी वल्लभ माहेश्वरी यांना मृत घोषित केले. चालकाला या अपघातात गंभीर दुखापत झालेली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला शोक
वल्लभ माहेश्वरी यांच्या निधनावर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “अलवरच्या रेणी पोलिस स्टेशन परिसरातील एक्सप्रेसवेवर झालेल्या दुःखद रस्ते अपघातात उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला शांती द्यावी आणि शोकग्रस्त कुटुंबाला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.”
अलवर के रैणी थाना क्षेत्र में एक्सप्रेस वे पर हुए एक दुर्भाग्यपूर्ण सड़क हादसे में उद्योगपति श्री वल्लभ माहेश्वरी के निधन का समाचार बेहद दुखद है। ईश्वर से दिवंगत आत्मा को शांति एवं परिजनों को इस दुःख को सहन करने की शक्ति देने की प्रार्थना करता हूं। ॐ शांति। — Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 8, 2026
शकुन ग्रुपच्या प्रगतीत माहेश्वरींचे मोठे योगदान
2000 च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या ‘शकुन ग्रुप’ला शिखरावर नेण्यात वल्लभ माहेश्वरी यांचा मोठा वाटा होता. संसाधन प्रक्रिया (Resource Processing) आणि औद्योगिक सेटअप क्षेत्रात या ग्रुपने आपले स्वतंत्र नाव कमावले आहे. हा ग्रुप केवळ कच्च्या मालावर प्रक्रियाच करत नाही, तर उत्पादनांची वाहतूक आणि वितरणातही आघाडीवर आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग विश्वाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात अतिवेग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.