Ongole Woman Dies Trapped in Elevator: आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल येथील ‘सूर्या टॉवर्स’ नावाच्या निवासी इमारतीत रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. वनिता असे 50 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. त्या आपली मुलगी आणि नातवासह लिफ्टमधून बाहेर येत होत्या. इच्छित मजल्यावर पोहोचल्यानंतर मुलगी आणि नातू लिफ्टमधून सुखरूप बाहेर पडले; मात्र, वनिता बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच लिफ्टचे दरवाजे पूर्ण उघडे असतानाच ती अचानक वेगाने खाली सरकू लागली.
चालत्या लिफ्टमध्ये अडकून महिला गंभीर जखमी; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
लिफ्टच्या अचानक झालेल्या अनपेक्षित हालचालीमुळे वनिता गोंधळल्या आणि त्यांनी लगबगीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्या मजला आणि चालत्या लिफ्टच्या मध्येच गंभीररीत्या अडकल्या. आरडाओरड ऐकून इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले आणि आपत्कालीन उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीराला झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
A horrifying lift accident in Ongole has claimed the life of a 50-year-old woman after an elevator at Surya Towers allegedly moved down suddenly with its door open, leaving her with little time to react. The incident, which occurred on Sunday, has raised serious questions over… pic.twitter.com/2KqtmYPynY — Hate Detector ? (@HateDetectors) August 20, 2026
नियमित देखभालीवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह; पोलिसांकडून चौकशी सुरू
या धक्कादायक दुर्घटनेमुळे बहुमजली इमारतींमधील लिफ्टची नियमित देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरवाजे उघडे असतानाच लिफ्ट खाली जाण्यामागचे मुख्य तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सोसायटी प्रशासनाकडून लिफ्टची नियमित तपासणी व देखभाल वेळेवर केली जात होती की यात निष्काळजीपणा झाला आहे, या दृष्टीने तपास सुरू केला आहे.