मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता ललित प्रभाकर आता एका अत्यंत आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण, रोमँटिक आणि सकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला ललित या चित्रपटात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची भूमिका साकारणार आहे.
अलीकडेच निर्माता दिनेश विजान यांच्या निर्मिती संस्थेने ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि कलाकारांचे लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हा चित्रपट ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पकडण्यात आलेल्या एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा हा न्यायालयीन प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारण्याची जबाबदारी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणत्याही कृत्रिम मेकअपचा आधार न घेता व्यक्तिमत्त्वातील बारकावे आत्मसात करण्यावर भर दिला आहे.
मात्र, सर्वाधिक चर्चा होत आहे ती ललित प्रभाकर यांच्या लूकची. सोशल मीडियावर पोस्टर समोर येताच अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. “हा खरंच ललित आहे का?”, “लूक पाहून ओळखणं कठीण झालं”, “अभिनेता म्हणून ललितने पुन्हा स्वतःला सिद्ध केलं” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून दिल्या जात आहेत.
या चित्रपटात वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले असून हा चित्रपट येत्या ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. न्यायव्यवस्था, दहशतवादाविरोधातील लढा आणि एका वकिलाचा संघर्ष यावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.