Shakeela Neck Surgery : सतत मोबाईल वापरण्याची सवय आणि चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे प्रसिद्ध अभिनेत्री शकीलाला मोठ्या वैद्यकीय संकटाचा सामना करावा लागला आहे. स्मार्टफोनवर तासन्तास गेम खेळणे आणि सोशल मीडियावर रील्स पाहणे यामुळे तिच्या मानेच्या नसांवर गंभीर ताण आला. या आजारपणावर उपचार करण्यासाठी तिला शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च आला आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्यानंतर अभिनेत्रीने एक व्हिडिओ संदेश जारी करत आपल्या चाहत्यांना मोबाईलच्या अतिवापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चुकीची जीवनशैली आणि मोबाईलच्या आहारी जाण्याचे परिणाम
आपला अनुभव सांगताना शकीला म्हणाली की, ती दररोज एकाच स्थितीत पडून सलग 4 तास फोनवर गेम खेळत असे. केवळ चहा किंवा कॉफी पिण्यापुरता ब्रेक घेऊन ती पुन्हा युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहण्यात व्यस्त राहायची. अशा अयोग्य शारीरिक स्थितीत दीर्घकाळ फोन वापरल्यामुळे तिच्या मानेतील मज्जातंतूंना इजा झाली आणि शेवटी डॉक्टरांना शस्त्रक्रियेचा मार्ग निवडावा लागला. सध्या तिला आंघोळ किंवा खाण्यापिण्यासारख्या अगदी दैनंदिन वैयक्तिक कामांसाठीही इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.
पालक आणि तरुणांना महत्त्वाचा सल्ला
शस्त्रक्रियेच्या त्रासातून जात असताना शकीलाने पालकांना आपल्या लहान मुलांच्या हाती स्मार्टफोन देताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल हे एक उपयुक्त साधन असले, तरी त्याचा अनावश्यक वापर शारीरिक व आर्थिक नुकसान घडवून आणू शकतो, असा इशारा तिने दिला. फक्त अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच फोनचा वापर करा, अन्यथा माझ्यासारखा 3 लाखांचा नाहक दंड आणि शारीरिक वेदना सहन कराव्या लागतील, असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे. 1990 च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या शकीलाने मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांत तिने बोल्ड भूमिका सोडून चरित्र अभिनेत्री म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.