WPL 2026: स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीने समीकरणं बदलली, पाहा अपडेटेड स्क्वॉड

वुमन्स प्रीमियर लीग 2026 सुरू होण्याआधी अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे सर्व संघांमध्ये बदल करण्यात आले असून, सुधारित संघरचना आणि नव्या कर्णधारांसह यंदाची स्पर्धा अधिक रंगतदार ठरणार आहे

WPL 2026: स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीने समीकरणं बदलली, पाहा अपडेटेड स्क्वॉड

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) आता अगदी तोंडावर आली असून महिला क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेते मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्याआधीच काही मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेतल्याने यंदाच्या हंगामात संघांच्या रणनीती आणि संतुलनावर परिणाम होताना दिसत आहे.

यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स. विशेष बाब म्हणजे, यापैकी काही संघांमध्ये कर्णधारपदात बदल करण्यात आले असून, शेवटच्या क्षणी झालेल्या खेळाडूंच्या बदल्यांमुळे प्रत्येक संघ नव्या रूपात मैदानात उतरणार आहे.

स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका

या हंगामाआधी सर्वात मोठा धक्का रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बसला आहे. संघाची स्टार अष्टपैलू एलिस पेरीने वैयक्तिक कारणांमुळे WPL 2026 मधून माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या अनुभवात आणि ऑलराऊंड ताकदीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, आरसीबी व्यवस्थापनाने तिच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज व अष्टपैलू सायली सातघरेला संधी देत देशांतर्गत प्रतिभेवर विश्वास दाखवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा बदल स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही. तिच्या जागी दिल्लीने अनुभवी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर एलाना किंगला संघात सामील करून घेतलं आहे. त्यामुळे दिल्लीचा गोलंदाजी विभाग अधिक मजबूत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यूपी वॉरियर्स संघासाठीही हा हंगाम बदलांचा ठरला आहे. संघाची महत्त्वाची खेळाडू तारा नॉरिस हंगामातून बाहेर पडल्याने व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन फलंदाज अष्टपैलू चार्ली नॉटला संघात घेतलं आहे. चार्ली नॉटकडून मधल्या फळीत स्थैर्य आणि अष्टपैलू योगदानाची अपेक्षा असणार आहे.

मुंबई इंडियन्स: अनुभव आणि संतुलन

गतविजेते मुंबई इंडियन्स यंदाही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. नताली सायव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर आणि शबनम इस्माईलसारख्या अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमुळे संघ संतुलित दिसतो. तर अमनजोत कौर, सायका इशाकसारख्या युवा भारतीय खेळाडूंवरही मोठी जबाबदारी असेल. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग मजबूत असल्याने मुंबई पुन्हा एकदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

आरसीबी: नव्या संयोजनासह मैदानात

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यंदा नव्या संयोजनासह उतरतेय. एलिस पेरी नसली तरी स्मृती मानधना, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर आणि ग्रेस हॅरिससारख्या खेळाडूंमुळे संघात दम आहे. सायली सातघरेसाठी हा हंगाम स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी ठरणार आहे.

यूपी वॉरियर्स: कर्णधार बदलाचा परिणाम?

यूपी वॉरियर्समध्ये मेग लॅनिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दीप्ती शर्मा, सोफी एकलस्टोन, हरलीन देओल आणि किरण नवगिरेसारख्या खेळाडूंमुळे संघात अनुभव आणि आक्रमकता दोन्ही आहे. चार्ली नॉटचा समावेश संघाला अतिरिक्त बळ देऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्स: युवा आणि अनुभवाचा मेळ

दिल्ली कॅपिटल्समध्ये जेमिमा रोड्रिग्जकडे नेतृत्व असून, शफाली वर्मा, मारिझान काप, एलाना किंग आणि स्नेह राणासारख्या खेळाडूंमुळे संघ मजबूत दिसतो. सदरलँडच्या अनुपस्थितीत एलाना किंगवर गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.

गुजरात जायंट्स: आंतरराष्ट्रीय स्टार्सवर भर

ॲश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्सकडे बेथ मुनी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग आणि डॅनी व्याटसारख्या दिग्गज खेळाडूंचा भक्कम आधार आहे. हा संघ कागदावर अत्यंत मजबूत वाटतो आणि यंदा गुजरात जायंट्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

स्टार खेळाडूंच्या माघारीमुळे काही संघांना फटका बसला असला, तरी नव्या खेळाडूंमुळे WPL 2026 अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हं आहेत. बदललेले कर्णधार, नव्या रणनीती आणि युवा खेळाडूंना मिळालेल्या संधी यामुळे हा हंगाम महिला क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या थरारक स्पर्धेकडे लागल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number