Tirupati Laddu Ghee Scam ED Arrest: जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील (लाडू) तूप भेसळ प्रकरणाचा तपास करत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यात तूप पुरवठा करणाऱ्या 'सुकृती फूड्स' कंपनीचे मालक कैलाश चंद मंगला यांना हैदराबाद ईडी कार्यालयाने 17 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) अटक केली आहे. विशाखापट्टणम येथील विशेष न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या अटकेमुळे प्रसादातील तुपाच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची साखळी उघडकीस आली आहे.
गायीच्या तुपाच्या नावाखाली पाम तेल आणि धोकादायक रसायनांचा वापर
ईडीने न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) पुरवले जाणारे तूप हे शुद्ध गायीचे नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. आरोपी कैलाश चंद मंगला याने आपल्या कारखान्यात रिफाइंड पाम तेल, पामोलिन, पाम कर्नल तेल यांसह MG-90, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसिट सॉफ्ट 400 आणि ॲसिटिक ॲसिड एस्टर यांसारख्या विविध घातक रसायनांचे मिश्रण करून हे भेसळयुक्त तूप तयार केले होते. हे बनावट मिश्रण 'ॲगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप' म्हणून टीटीडीला पुरवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
96 कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप; शेल कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर
वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत टीटीडीला एकूण 230 कोटी रुपयांचे तूप पुरवण्यात आले होते, ज्यापैकी एकट्या मंगला याने सुमारे 96 कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप तयार करून पुरवल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. या महाघोटाळ्यात आरोपीने श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि ए. आर. डेअरी फूड्स यांसारख्या अनेक बनावट (Shell) कंपन्यांच्या साखळीचा वापर केला होता. या शेल कंपन्यांमार्फतच भेसळयुक्त पदार्थांची खरेदी आणि तुपाच्या पुरवठ्याचे नियोजन केले जात होते.
देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट आणि तपासाला गती
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती मंदिराच्या प्रसादात अशा प्रकारे रासायनिक द्रव्यांचा वापर करून भेसळ केल्याचे उघडकीस आल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आणखी अनेक बड्या हस्ती आणि डेअरी कंपन्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीच्या या कारवाईमुळे आता या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची पाळेमुळे खोदून काढण्यास मदत होणार असून, आगामी काळात आणखी काही जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.