Republic Day High Alert : दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील 4 राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा (High Alert) देण्यात आला आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने (IB) दिलेल्या ताज्या अहवालानुसार, दहशतवादी संघटना प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठे हल्ले करण्याची शक्यता आहे. या कटामागे खलिस्तानी गट आणि बांगलादेशस्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आले असून सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे.
गँगस्टर्सचा 'फूट सोल्जर' म्हणून वापर
गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले खलिस्तानी हँडलर्स भारतातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी स्थानिक गुन्हेगारांचा वापर करत आहेत. पंजाबमधील कुख्यात गँगस्टर्स आता खलिस्तानी दहशतवाद्यांसाठी 'फूट सोल्जर' (दूत) म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नेटवर्कचा प्रभाव हरियाणा, दिल्ली-NCR, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अधिक सक्रिय असून, स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून दहशतवादी आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
लाल किल्ल्यावरील भीषण हल्ल्यानंतर यंत्रणा सतर्क
दिल्लीत 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. यंदा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षा दलांकडून अभूतपूर्व आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांकडून 'मॉक ड्रिल'द्वारे सज्जतेची चाचणी
दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता, दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ डिस्ट्रिक्टने शहरातील संवेदनशील भागांत तातडीने सराव मोहिमा (Mock Drill) राबवल्या आहेत. लाल किल्ला, ISBT काश्मिरी गेट, चांदणी चौक आणि मेट्रो स्थानकांवर सुरक्षा दलांनी विशेष सराव केला. अचानक उद्भवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा किती सज्ज आहेत, याची पडताळणी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या सरावाचा मुख्य हेतू होता.