PNB Fake Currency Scam: उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) सोफिया मार्केट शाखेतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. बँकेच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'करन्सी चेस्ट'मध्ये तब्बल 17 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने संपूर्ण बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) जयपूर येथील चेस्टमध्ये रोकड पाठवल्यानंतर नोटांच्या मोजणीत हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला. सुरुवातीला काही लाख रुपयांची तफावत वाटणारे हे प्रकरण तपासादरम्यान 17 कोटींपर्यंत पोहोचले असून, करन्सी चेस्टचे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
SIT अन् सीबीआय चौकशीची शक्यता
या प्रकरणाची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी जयपूरला 11.50 कोटी रुपयांची रोकड पाठवल्यानंतर झाली. तेथे 4 लाख 30 हजार रुपये कमी आढळल्याने पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता विशाल कुमार नावाचा पार्ट-टाइम हाऊसकीपर नोटांच्या बंडलमधून पैसे चोरताना स्पष्ट दिसला. मात्र, या चोरीच्या तपासातून 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या ऑडिटमध्ये थेट 17 कोटींच्या बनावट नोटाच करन्सी चेस्टमध्ये जमा असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश पोलीस विशेष तपास पथक (SIT) स्थापन करत असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी होण्याचीही दाट शक्यता आहे.
सुरक्षा व्यवस्था अन् मशीन तपासणीवर प्रश्नचिन्ह
बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये कोट्यवधींच्या बनावट नोटा आल्याच कशा आणि नोटा मोजणाऱ्या अत्याधुनिक मशीन्स या बनावट नोटा ओळखण्यात कशा अपयशी ठरल्या, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि संशयित सहभागाचा ठपका ठेवत बँकेने वरिष्ठ मंडळ व्यवस्थापक रवी कुमार कांसे, करन्सी चेस्ट मॅनेजर सुशील कुमार आणि अमित कुमार या तीन वरिष्ठ व्यवस्थापकांना तातडीने निलंबित केले आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा केवळ कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे की बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालणारे रॅकेट, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.