Eknath Shinde: नसरापूर येथील 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवणाऱ्या नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे. “अशा क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना समाजात जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि ते आज या निकालातून सिद्ध झाले आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा निकाल न्यायव्यवस्थेतील एक ‘बेंचमार्क’ ठरेल आणि भविष्यात अशा प्रवृत्तीचे गुन्हेगार असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक निकालासाठी त्यांनी न्यायदेवतेचे मनापासून आभार मानले असून न्यायाधीशांचे विशेष अभिनंदन केले आहे.
पोलिसांची तत्परता; रात्रीचा दिवस करून गोळा केले पुरावे
या संवेदनशील खटल्याचा तपास अत्यंत वेगाने पूर्ण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे विशेष कौतुक केले. संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी जनभावना लक्षात घेऊन युद्धपातळीवर केला. केवळ 2 आठवड्यांच्या विक्रमी वेळेत पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट (दोषारोपपत्र) दाखल केली होती. स्वतः मुख्यमंत्री महोदय या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होते, तर एकनाथ शिंदे हे स्वतः पोलीस महासंचालक (DG), पोलीस अधीक्षक (SP) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होते. पोलिसांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळेच गुन्हेगाराला सुटण्याची कोणतीही संधी मिळाली नाही, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
तिन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा!
या खटल्याचे गांभीर्य स्पष्ट करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आरोपीवर पोक्सो (POCSO), अत्याचार आणि खून असे 3 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची दाहकता ओळखून तिन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्याला तात्काळ फाशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही केस ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ अशीच होती. या निकालामुळे गुन्हेगारी जगतात एक कडक सामाजिक संदेश गेला असून, महाराष्ट्रात काहीही करून चालणार नाही, गुन्हा केल्यास थेट फासावरच लटकवले जाईल, ही भीती गुन्हेगारांमध्ये निर्माण होईल.
पीडित कुटुंबासह महाराष्ट्रातील माता-भगिनींना दिलासा
शेवटी, या लढ्यात योगदान देणाऱ्या सरकारी वकील, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी या सर्वांचे शिंदे यांनी मनापासून अभिनंदन केले. या न्यायनिवाड्यामुळे नसरापूरच्या त्या पीडित चिमुरडीच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला असून, महाराष्ट्रातील तमाम मुली-बाळी आणि त्यांच्या पालकांना एक मोठा सुरक्षिततेचा दिलासा मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.