छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये फिल्म इंडस्ट्रीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर नुकताच समोर आला आहे. मणिपूर येथील एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा खोटा संबंध असल्याचे सांगत एका कॉलेजच्या नावाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणी संस्थापक असलेल्या पती-पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
यज्ञेश रामकृष्ण बारहाते आणि रेणुका भाले, अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. दोघेही सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. गारखेडा या परिसरातील 23 वर्षीय विद्यार्थिनीने या प्रकरणी पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑगस्ट 2023 मध्ये यज्ञेश बारहाते याने यशवंत कला महाविद्यालयात जात विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करत त्याने अॅनिमेशनमधील अमूक पदवी घेतल्यास फेट फिल्म इंडस्ट्रीमध्ये 100 टक्के नोकरी मिळेलचं, असं सांगितलं शिवाय कॉलेजला संबंधित विद्यापीठाची सुद्धा मान्यता असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले.
23 वर्षीय विद्यार्थीनीने असा खुलासा केला अन्…
दिलेल्या या आश्वासनांवर विश्वास ठेवत असंख्य विद्यार्थ्यांनी प्रवेश ही घेतला. त्यानंतर तक्रार दिलेल्या विद्यार्थिनीकडून प्रवेश शुल्क आणि इतर शुल्काच्या नावाखाली तब्बल 94 हजार 501 रुपये घेण्यात आले. मात्र, काही दिवसांनंतर कॉलेजशी विद्यापीठाशी असलेला संबंध आणि नोकरीच्या खात्रीबाबत विद्यार्थिनीला संशय आला.
त्यानंतर चौकशी केल्यावर संबंधित माहितीबाबत संशय अधिक वाढत गेला आणि आर्थिक फसवणूक झाल्याचे तिच्या समोर आले. सध्या याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी यज्ञेश बारहाते आणि रेणुका भाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. ज्यात विद्यार्थ्यांकडून किती रक्कम घेतली गेली तसेच या प्रकरणात अजून किती जणांची फसवणूक झाली आहे,याचा तपास पोलीस करत आहेत.